हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आहे उराउरांत.. नव्या पिढीलाही माहित होऊ द्या.. वेडात मराठे वीर दौडले सात.. सरनोबतांचा पराक्रमी इतिहास रुपेरी पडद्यावर अवतरण्यास सज्ज आहे. तुम्ही सज्ज आहात का हा इतिहास अनुभवायला…? पावनखिंड आणि शेर शिवराज नंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ज्याचे नावच ‘वीर दौडले सात’ असे आहे. या शूर वीरांच्या गाथेला उजाळा देण्यासाठी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा भव्यदिव्य चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच याचे पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट मराठीसह हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
आपल्या महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्यासह संत, महात्मे, शूर-वीर आणि लोककलेचा जिवंत वारसा आहे. आपल्या महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयकारात आजही तितकीच प्रबळ ताकत आहे. त्यांच्या पराक्रमाने आणि शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. यासाठी महत्वाची होती ती निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ. जी प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात होती. शेकडो वीरांच्या शौर्याने आणि रक्ताने माखलेल्या पवित्र भूमीवरील मातीचा कण कण इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे जोपर्यंत या वीरांची आठवण काढली जात नाही तोपर्यंत इतिहास पूर्ण होत नाही. या चित्रपटातून वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले आहे ते म्हणजे, प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी शिंदे. यांच्या पराक्रमाने उजळली आहे महाराष्ट्राची भूमी. त्यामुळे हा चित्रपट नसानसात रक्त पुन्हा सळसळवणार यात काही वादच नाही.
आपण लहानपणापासून ‘म्यानातून उसळे तलवारीची पात। वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे ऐकले असेल पण हे सात मराठा वीर कोण..? आणि ते का दौडले..? आणि त्यांचे पुढे काय झाले..? याचा मागोवा घेणारा हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा धैर्यशील माणसांची फौज तयार केली होती जी माणसे स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती द्यायला तत्पर असत. केवढी ही स्वामी निष्ठा आणि केवढे ते स्वराज्य प्रेम. हेच अनुभवण्यासाठी मांजरेकर हा चित्रपट घेऊन येत आहेत. छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर, दौडले सात असे कॅप्शन लिहीत याचे मराठी मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. तर हिंदी मोशन पोस्टर रिलीज करताना हुक्म पे शिवराज के, दिखाने दुश्मन को औकात, खौलने लगा जो खून, जलजले निकल पडे वो सात, छत्रपती शिवाजी महाराज के जांबाज वीरों की बलिदान गाथा, ‘वो सात’’ असे कॅप्शन लिहिलेले आहे.
Discussion about this post