हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी चंद्रमुखी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट अत्यंत मनाला भिडणारा आहे. सध्या चंद्रमुखीच्या गाण्यांची आणि कथानकाची चर्चा सर्वत्र असताना प्रेक्षकच नव्हे तर समीक्षकही चंद्राच्या रंगात न्हाऊन गेले आहेत. सर्वांनीच चंद्राला भरभरून प्रेम दिले आहे. चित्रपटातील एकाहून एक गाणी तर थिरकायला लावताना दिसत आहेत. अशातच या चित्रपटातील काळजाला हात घालणारं कान्हा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. उया गाण्याने अक्षरशः सर्वाना मंत्रमुग्ध केलं आहे.
चंद्रमुखी या चित्रपटातील ‘कान्हा’ हे गाणं अतिशय लक्षवेधी आणि मन मोहणारं आहे. या गाण्यात भगवान श्रीकृष्णाची भक्त असलेली चंद्रमुखजी चित्रपटाची नायिका अर्थात चंद्रा तिच्या मनातील भावना तिच्या कान्हापुढे व्यक्त करताना दिसत आहे. थेट मनाला भिडणारे हे गाणे चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे संगीत अजय- अतुल यांचे असून अजय गोगावले यांनी ‘कान्हा’ या गाण्याला आपले स्वर दिले आहेत. तर गुरु ठाकूर यांचे बोल या गाण्याला लाभले आहेत.. यातच सारं आलं. हे गाणं केवळ गाणं नाही तर एक भावना आहे.. एक ओढ आहे आणि या स्वरांमध्ये जादू आहे कि कुणीही याकडे ओढला जाईल.
‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर या गाण्याबाबत आणि एकंदरच चित्रपटाबाबत व्यक्त झाले. दरम्यान ते म्हणाले कि, “या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतोय. आजही ‘चंद्रमुखी’साठी चित्रपटगृहासमोर हाऊसफुलाचा बोर्ड लागत आहे. “चंद्रा’ या शीर्षकगीताने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजही अनेक जण या गाण्यावर थिरकत आहेत. तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारे असे प्रेम पाहून खूप छान वाटतेय. या चित्रपटाची कथा तर दमदार आहेच. मात्र चित्रपटाचे संगीतही त्याच ताकदीचे आहे. चित्रपटातील गाण्यांचे श्रेय पूर्णपणे संगीत टीमला जात असले तरी सादर करण्यासाठी अमृतानेही खूप मेहनत घेतली आहे आणि सगळ्यात प्रसादचा सिंहाचा वाटा आहे. ‘चंद्रमुखी वर सर्वच स्तरातून होणारा कौतुकांचा वर्षाव पाहून प्रसाद, अमृता, आदिनाथ, अजय-अतुल, एकंदरच संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे दिसत आहे. ‘कान्हा’ हे गाणे सध्या प्रदर्शित करण्यात आले असून इतर गाण्यांप्रमाणे हे गाणेही रसिकांना भावेल.
Discussion about this post