हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आगामी मराठी चित्रपट महाराष्ट्राचे शाहीर याचे पोस्टर व्हायरल होत आहे. मराठी अभिनेता अंकुश चौधरी हा या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर ह्ये नुसतं नाव ऐकलं तरीही डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते त्यासाठी लढले झगडले आणि उभे राहिले ते महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. त्यांनी महाराष्ट्राला लोककलेचा असा वारसा दिला आहे जो निरंतर असाच धगधगत राहील. या ज्योतीची तेव इतकी बुलंद आहे. दरम्यान त्यांचा नातू दिग्दर्शक केदार शिंदे याने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करून जेव्हा पोस्टर रिलीज केले तेव्हा अरेच्छा! पोस्टरमध्ये अंकुश दिसतोय. तेव्हापासून लोकांनी एका प्रश्नाने केदार शिंदे याना भंडावून सोडले आहे. याबाबत अखेर केदार शिंदे व्यक्त झाले आहेत.
या चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते रिलीज झाले. यानंतर चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झालं आणि अंकुश चौधरीच का..? असा प्रश्न केदार शिंदे यांना लोक विचारू लागली. यानंतर आता शाहीर साबळे आणि शाहीर साबळे यांच्या भूमिकेतील अंकुश चौधरी यांचा एकत्र फोटो केदार यांनी शेअर केलाय. सोबत लिहिले कि, ‘प्रत्येक जण मला विचारतोय की अंकुश चौधरी महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य आहे? तो खुप वेगळा दिसतो.
काहींनी हे पोस्टर पाहून अंकुशला ओळखलं सुध्दा नाही. नीट पाहा. एक फोटो अंकुशचा आहे आणि दुसरा शाहीर साबळे यांचा!! ही कमाल दी विक्रम गायकवाड टीम यांची.. जगदीश येरे यांच्याकडून हा लूक निर्माण झाला आहे. युगेशा हीने कॉस्च्युम केले आहेत. लोक स्टुडिओ यांनी या सिनेमाचं पोस्टर डिझाईन केलं आहे. ही सुरूवात आहे. अजून बराच पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण प्रत्येक गोष्ट याच पॅशनने करून हे शिवधनुष्य आम्ही नक्कीच पेलू. आपले आशीर्वाद असू द्यात. श्री स्वामी समर्थ.’
शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं आहे. त्यामुळे त्यांचं महाराष्ट्र गीत असो किंवा मग खंडोबाचा जागर ते प्रत्येक गाणं मराठी मनावर कोरल आहे. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आजही स्मरणात असेलच यात काही वाद नाही. त्यामुळे शाहीर साबळे कोण होते आणि त्यांनी काय केलं हे आजच्याही पिढीला माहित असणे गरजेचे आहे यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केले असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाची पटकथा, संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना अजय- अतुल यांचे संगीत लाभणार आहे.
Discussion about this post