हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | येत्या ३० मेपासून कलर्स मराठी वाहिनीवर शिरीष लाटकर लिखित ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत शंकर महाराजांचा जीवन अध्याय उलगडणार आहे. ज्या शंकर महाराजांना भक्तगण साक्षात महादेव शंकराचा अवतार मानतात त्यांच्या जीवनाचा तो अध्याय जो कुणालाच ठाऊक नाही तो आता उलगडणार आहे. मैं कैलाश का रहने वाला हू, मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी पीडितांच्या दु:खांचं निवारण केलं त्याचे अनुयायी आणि भक्तसमुदाय फार मोठा आहे. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष म्हणून शंकर महाराज यांची ख्याती आहे. त्यांचे जीवन एक संघर्ष असला तरीही त्यांची भक्ती आयुष्यात हर्ष आणणारी आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर आतापर्यंत अनेक अध्यात्मिक मालिका प्रसारित झाल्या आहेतं. पण या मालिकेविषयी लोकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. या मालिकेत एक असा अध्याय लोक जाणून घेतील ज्यातून बरच काही शिकता येईल. या मालिकेमध्ये शंकर महाराजांच्या आईची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली आहे. अभिनेत्री उमा पेंढारकर हिने याआधी कलर्स मराठीवरील स्वामिनी या मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला प्रकाश झोतात आणले आणि यानंतर ती अग्गबाई सूनबाई या मालिकेतही शुभ्राच्या भूमिकेत दिसली होती. आता पुन्हा एकदा योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. तर, वडिल चिमणाजी यांची भूमिका अतुल आगलावे साकारणार आहेत. तसेच मुख्य बाल शंकर महाराजांची भूमिका ही आरुष बेडेकर साकारणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री उमा पेंढारकर म्हणाली की, “कलर्स मराठी वाहनीवर स्वामिनी मालिकेत पार्वतीबाई पेशवा हे पात्र साकारल्यावर आता प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे पुन्हा एकदा पार्वतीबाई म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दोन्ही पार्वतीबाईंमधील एक समान धागा म्हणजे त्यांच्यातील मातृत्वाचे भाव, देवावर अपार श्रध्दा. महाराजांची आई साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्या पात्राविषयी अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मालिकेतून महाराजांचा विचार, त्यांचं कार्य, पोहचविण्याची संधी मला मिळाली हा त्यांचा एक मोठा आशीर्वाद असे मी मानते. म्हणूनच अतिशय मनापासून आणि जबाबदारीने या भूमिकेसाठी मी सज्ज झाली आहे”.
Discussion about this post