हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी मराठी सिनेसृष्टीत एका अद्भुत कलाकृतीचा समावेश झाला. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अमृता खानविलकरसह आदिनाथ कोठारे अभिनित बहुचर्चित चंद्रमुखी या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटातील गाणी हि विशेष गाजली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल १ कोटींहून अधिकची कमाई केली. या चित्रपटाचे प्रमोशन बॉलिवूड चित्रपटांनाही लाजवेल असे होते. या चित्रपटाच्या रिलीजनंतर मिळालेला यश पाहता चंद्रा अर्थात चंद्रमुखी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकर थेट सोलापुरात स्वामी आणि भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात पोहोचली. भवानीचं दर्शन घ्यायला गेलेल्या अमृताने या प्रवासाचा अनुभव आणि भावना एका व्हिडिओतून शेअर केल्या आहेत.
चंद्रमुखी चित्रपटाचे यश पाहता आभार मानण्यासाठी अमृता परमेश्वराच्या चरणी लिन झाली आहे. त्यासाठीच हा एक खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूर येथे ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे. हा देवदर्शनाचा व्हिडीओ तिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने अतिशय भावूक कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तिने या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी रिलीज झाला.. प्रमोशनच्या गडबडीत राहून गेलं होतं.. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही”, असे तिने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला ‘चंद्रमुखी’ हा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत. या चित्रपटात दौलत या मुख्य पात्राची भूमिका आदिनाथ कोठारेने आणि चंद्रा हि भूमिका अमृता खानविलकरने साकारली आहे.
Discussion about this post