हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे आणि अपमानकारक शब्द वापरलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. हि पोस्ट मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर शेअर केली होती. यानंतर समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी केतकी चितळेवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि आता ती न्यायालयीन कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या मात्र याबाबत अद्याप अभिनेते प्रवीण तरडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर प्रविण तरडे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांना या प्रकरणी मत विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
प्रवीण तरडे म्हणाले कि, “केतकी प्रकरणाबद्दल मला खरच काही माहिती नाही. हे प्रकरण झालं तेव्हा धर्मवीर चित्रपटाचे अंतिम काम सुरू होते. ते झाल्यानंतर प्रमोशनमध्ये वेळ गेला. ते संपल्यानंतर तीन दिवस हंबीराव चित्रपटाचे अंतिम काम सुरू केलं. त्यामुळं काय झालंय हे माहीत नाही. परंतु, कुठल्याच अभिनेत्याने विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये या मताचा मी आहे. मी चित्रपट काढला तर प्रत्येक घटक बघणार आहे. माझ्यावर प्रेम करणार आहे. माझ्या अभिनयामुळं, कामांवर प्रेम केल्यामुळं त्यांचा आयडॉल झालो आहे. त्याचा वापर मी कुठल्या राजकीय पक्षसाठी नाही केला पाहिजे,”
पुढे म्हणाले कि, “आपल्यावर प्रेम करणारी माणसे सर्वांची आहेत. त्यामुळं कुठल्याच अभिनेत्याने एक विशिष्ट भूमिका कधीच घेतली नाही पाहिजे. अभिनेता हा सर्वांचा असतो. काही विशिष्ट लोक येत नाहीत त्याचा सिनेमा पाहायला. कलाकृती समाजाची आहे. कलाकार हा समाजाच देणं असू शकतो. समाजाने प्रश्न विचारावेत त्यानं त्याच उत्तर द्यावे या मताचा मी आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही. ज्या दिवशी ते करेल तेव्हा त्याच दिवशी हे क्षेत्र बंद करेल. दोन्ही क्षेत्राचा वापर एकमेकांसाठी नाही करायचा. एक कुठलं तरी पूर्ण वेळ असावं. कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे.”
Discussion about this post