हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विदर्भातील लोकप्रिय झाडीपट्टी नाटकाच्या खास शैलीतील दमदार चित्रपट ‘झॉलीवूड’ आज दिनांक ३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवात या चित्रपटाला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हा चित्रपट दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘झॉलीवूड’ आज रिलीज होण्यापूर्वी त्याचे गुरुवारी स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. ज्यामध्ये नेहमी चर्चेत असणारे किरण मानेदेखील हजार होते. या चित्रपटातील खुशखुशीत भाष्य शैली आणि अभिनय पाहून ते भारावले आणि त्यांनी फेसबुकवर चित्रपटाचे कौतुक करणारी खास पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले आहे कि, “एकदा बी.व्ही. कारंथजींनी आम्हाला एक कन्नड नाटक बघायला नेलं. साध्या तंबूतलं लोककलावंतांचं ते नाटक होतं. कार्डबोर्डचा हत्ती, पावसाच्या सीन्समध्ये वरून पाइपनं सोडलेलं पाणी.. आम्ही टवाळी करत खूप हसलो. रात्री जेवताना कारंथजी शांतपणे इतकंच म्हणाले, ‘‘हसने का नहीं. हर एक का अपना अपना तरीका होता है, बात कहने का!’’ मराठीतला एक लै भारी नाटककार अभिराम भडकमकरनं सांगीतलेला एक किस्सा ! काल दिग्दर्शक तृशांत इंगळेनं ‘झाॅलीवूड’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बोलावलं होतं. सिनेमा पाहिल्यावर हा किस्सा आठवला…
…आपल्याकडं एकाच सपक प्रमाणभाषेत होणारी सॉफिस्टिकेटेड नाटकं म्हणजेच वरच्या दर्जाची नाटकं, सो काॅल्ड स्पष्ट उच्चार असलेले नट म्हणजे ग्रेट नट, असा एक लै मोठ्ठा गैरसमजय. मराठी नाटकात नट म्हणून करीयर करायचंय? मग नाटकातलं पात्र सातार्यात रहाणारं असो, गडचिरोलीतलं असो किंवा इंदौरचं…तुम्ही एकाच पुणेरी गुळमट प्रमाणभाषेत बोला. घरातला नोकर असला तरी व्याकरणाचे नियम पाळत शुद्ध बोलला पायजे. नादखुळा.. ॲवाॅर्ड ‘फिक्स’च ! तमाशा, दशावतारी खेळ, लोकनाट्य या ओरिजिनल नाट्यप्रकारांना दुय्यमच लेखलं जातं. तथाकथित उच्चभ्रू नाट्यक्षेत्र, बोलीभाषेत बोलणार्या लोककलावंतांना ‘अभिनेता’ म्हणून मान्यताच देत नाही.
अशा परिस्थितीत विदर्भातल्या ‘झाडीपट्टी’ रंगभूमीला आपलं मानणं सोडा पण त्याची माहीतीही नसते कुणाला. झाडीपट्टी नाटकांची परंपरा लैS जुनी हाय भावांनो. आजपर्यन्त तिथल्या प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी ती जपलीय. त्या रंगभूमीची ओळख जगाला करून देणारा सिनेमा आलाय – ‘झाॅलीवूड’ ! तृशांत इंगळे या जिद्दी पोरानं आपल्या मातीतल्या या कलेला मोठ्या पडद्यावर आणलंय. आजपर्यन्त आपण न पाहिलेलं जग तृशांतनं अतिशय प्रभावीपणे कॅमेर्यात उतरवलंय. झाडीपट्टीतले ओरिजिनल दलित-आदिवासी कलाकार घेतल्यामुळं अस्सलता जपली गेलीय.
झाडीपट्टीची ओळख करून देण्यापलीकडंही तृशांतला आणखीही बरंच काही सांगायचंय.. ‘और वो बात कहने का उसका अपना तरीका है’ ! ‘नाटक’ हा श्वास मानणार्या सिनेमाच्या हिरोनं ‘समता’ नांवाची नाट्यसंस्था काढणं.. प्रेक्षकांची मागणी म्हणून कौटुंबिक नाटक लिहून, त्यात खुबीनं ‘सामाजिक’ आशय देऊ पहाणं.. गाडगेबाबांच्या फोटोला हार घालून रिहर्सलला सुरूवात करणं आणि रिहर्सल हाॅलमध्ये दिसणारे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे फोटोज.. ज्यावर्षी पाऊस चांगला होऊन पिक उत्तम येतं त्यावर्षी नाटक धंदा तुफान तेजीत चालतो.. हे सगळं सूचक आहे. आणखीही बर्याच गोष्टी आहेत. त्या तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच बघा. तृशांत, मित्रा तू ‘झाॅलीवूड’ बनवून एकप्रकारे तुझ्या मातीचे ॠण फेडले आहेस. तुझा पिच्चर नक्की सुपरहिट होणार. इत्तका सुप्परहिट होणार की, शाहरूख सलमानही तुमच्या ‘प्रेस’ला फोन करून विचारतील की “आमालाही झाडीपट्टी नाटकात काम देऊन द्या नं बे..” लब्यू दोस्ता.. आणि खूप खूप शुभेच्छा ! – किरण माने.
Discussion about this post