हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलासृष्टीत दिलेले अमूल्य योगदान आणि गेली अनेक वर्ष रंगभूमीसह रुपेरी पडदा गाजवणाऱ्या सर्वोत्तम कलाकारांना सांस्कृतिक कलादर्पणच्या वतीने ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ देण्यात येतो. तर मराठी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिका कलाक्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. यंदाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत आणि यावर्षी ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२२’ हा येत्या ७ जून २०२२ रोजी मुंबईत संपन्न होणार आहे. या बहारदार आणि प्रतिष्ठित सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. इतकेच नव्हे तर यांच्यासह राजकारणातील आणि मुख्य म्हणजे कलासृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध नामांकित पुरस्कार देण्यात येणार आहेत. याकरिता योग्य नावांची निवड करण्यात आली असून या सोहळ्यात त्यांनाही सन्मानित केले जाईल.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा’ हा दरवर्षी मोठ्या आणि भव्य आयोजनासह पार पडतो. हा सोहळा महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरिता आणि समाजात मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि समुदायांना प्रोत्साहन देण्याकरीता आयोजित केला जातो. हे प्रशंसनीय कार्य चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करीत आहे. आजवर अनेक दिग्गज मंडळींना या संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २६ जून २०२२ रोजी ‘फक्त मराठी’ या मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी दिली आहे.
Discussion about this post