हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक अव्वल चित्रपट रिलीज होत आहेत. यात अनेक चित्रपट ऐतिहासिक असून आजची पिढी याला उत्तम प्रतिसाद देताना दिसतेय. आपला इतिहास सांगावा तेव्हढा कमीच आहे म्हणा.. पण किमान दिग्दर्शक तो लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न तरी करत आहेत. अलीकडेच बॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्यात शाब्दिक वॉर चालू असल्याचे पहायला मिळाले. पण तरीही ट्विटरवर मराठी भाषा ट्रेंड करत होती आणि आता एक असा चित्रपट रिलीज होतोय जो साऊथवर १००% भारी पडणार आहे. कारण अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट तब्बल ५ भाषांमध्ये रिलीज होतोय.
‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या सगळ्यात पहिल्या टीझरपासून हा सिनेमा चर्चेत आहे. यानंतर आता अलीकडेच आणखी एक टिझर रिलीज झाला आहे. या टीझरची सुरुवात भगव्या झेंड्याने होते आणि पुढे.. “सह्याद्रीला पूर्व एकच, अटकेपार सूर्य एकच, अखंड स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींचा शिवमंत्र एकच…हर हर महादेव”, अशा ओळी या टीझरमागे ऐकू येतात. हा चित्रपट एकाच दिवशी मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे हि अतिशय अभिमानाची बाब आहे. सुवर्ण इतिहासाचे हे एक तोरण आहे जे मराठी सिनेसृष्टीच्या दारावर मानाने सजणार आहे.
हा चित्रपट येत्या दिवाळीत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. अलीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचे यश त्याचा गवगवा मोठा दिसून आला. नक्कीच त्यांचे कलेचे ते यश होते. मात्र साऊथला कुणीच टक्कर देऊ शकत नाही असे जर कुणाला वाटत असेल तर या भव्य दिव्या चित्रपटाचा टिझर एकदा पहाच. याशिवाय या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हून अधिक तंत्रज्ञांचा या टीममध्ये समावेश आहे. त्यामुळे हा चित्रपट अतिशय लक्षवेधी असणार यात काहीच शंका नाही.
Discussion about this post