हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद हा त्याच्या अभिनयासाठी जितका ओळखला जातो त्याहून अधिक तो त्याच्या समाज कार्यासाठी ओळखला जातो. याआधी २०२० साली कोरोनाच्या महाभयंकर साथीदरम्यान तो लोकांसाठी देवदूत झाला. यानंतर आता त्याच्या प्रयत्नांनी एका चिमुकल्या जीवाला जगण्याची नवी आशा मिळाली आहे. सोनू सूदच्या प्रयत्नांनी बिहारच्या नावादा येथील ४ हात आणि ४ पाय असलेल्या चौमुखी नामक लहान मुलीवर शस्त्रक्रिया पार पडली. हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाली असून आता चौमुखी तुमच्या आमच्यासारखं सामान्य आयुष्य जगण्यास सज्ज आहे. याबाबत सोनू सूदने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून माहिती दिली आहे. यासाठी सर्व स्तरांवरून पुन्हा एकदा सोनूच्या मदतकार्याची चर्चा होतेय आणि कौतुकही केले जात आहे.
मेरा और चौमुखी कुमारी का सफ़र कामयाब रहा ❤️🙏 pic.twitter.com/Fj4TY8cGMS
— sonu sood (@SonuSood) June 9, 2022
मीडिया रिपोर्टनुसार, बिहारमधील नवादा येथील वारिसालीगंजच्या हेमदा गावातील ग्रामस्थ बसंत पासवान यांची मुलगी चौमुखी हि जन्मापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळी होती. तिला जन्मताच ४ हात आणि ४ पाय होते. यामुळे तीच जगणं जणू संघर्ष झाला होता. गरिबीमुळे बसंत आपल्या मुलीवर उपचार करू शकत नव्हते. दरम्यान, चौमुखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूद मदतीसाठी पुढे आला आणि अखेर आज चौमुखीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
चौमुखीच्या कुटुंबात एकूण ५ सदस्य आहेत. या ५ जणांपैकी ४ सदस्य अपंग आहेत. चौमुखीचे वडील बसंत पासवान आणि आई उषा देवी मजुरीचे काम करून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करतात. मात्र ते दोघेही परिस्थितीशी झगडत आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत. कारण ते दोघेही अपंग आहेत. अशा स्थितीत त्यांना चौमुखीचे उपचार करणे शक्य नव्हते. मात्र एके दिवशी चौमुखीचे वडील नवाडा डीएमकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले. तेव्हा डीएम ऑफिसमध्ये कुण्या व्यक्तीने चौमुखीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला असे समजत आहे. या व्हिडीओमुळे अनेकांनी चौमुखीसाठी मदतीचा हात पुढे केला.
अगदी अभिनेता सोनू सूदलादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माहिती मिळाली आणि यानंतर त्याने चौमुखीच्या कुटुंबाला संपर्क साधून त्यांना मुंबईला बोलावले. मुंबईत पोहोचल्यानंतर सोनू सूदने चौमुखी आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. यानंतर त्यांना उपचारासाठी सुरतला पाठवले. यानंतर सुरतमध्ये तज्ञ डॉक्टरांनी चौमुखीची तपासणी केली आणि त्यानंतर शस्त्रक्रियेची तारीख निश्चित झाली. पुढे बुधवारी ८ जून २०२२ रोजी तज्ञ डॉक्टरांच्या टीमने तब्बल ७ तास चौमुखीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यानंतर आज तिची प्रकृती व्यवस्थित असून काही दिवसांनी तिला डिसचार्ज देण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Discussion about this post