हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जर तुम्ही संगीताचे चाहते असाल तर तुम्हाला जस्टिन बिबर नक्कीच माहित असेल. अत्यंत लोकप्रिय हॉलिवूड गाण्यांचा गायक जस्टिन बिबरचे विविध भाषियक चाहते आहेत. त्या प्रत्येक चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून जस्टिन झगमगाटापासून फार दूर आहे. याचे नेमके कारण काय अशी अनेकांना उत्सुकता होती. अनेकांना वाटले होते कि जस्टिन नवं काहीतरी घेऊन लवकरच समोर येईल. पण तसं काही नसून जस्टिन एका दुर्मिळ आजाराशी झुंज देतोय अशी माहिती मिळाली आहे. हि बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली आहे तसे जस्टिनचे चाहते त्याच्या प्रकृतीची चिंता करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिनच्या मोठ्या विश्रांतीमागे त्याचं आजारपण कारणीभूत आहे. जस्टिन २८ वर्षाचा असून त्याच्या चेहऱ्याला पार्श्यल पॅरालिसिस झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याने आल्याला झालेल्या आजाराशी संबंधित माहिती दिली आहे. यात त्याने सांगितलंय कि, त्याला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt Syndrome) हा दुर्मिळ आजार झाला आहे.
यामुळेच त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला पॅरालिसिस झाला आहे. त्याने या व्हिडिओतून आपल्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. इतकेच नव्हे तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आगामी लाईव्ह कॉन्सर्ट शो रद्द केल्याचेही आपल्या चाहत्यांना कळवले आहे.
या व्हिडिओमध्ये जस्टिन म्हणतोय की, ‘मला हा आजार एका व्हायरसमुळे झालाय. त्याने माझ्या चेहऱ्याच्या नर्व्ह्जवर हल्ला केला. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे पॅरालिसिस (face paralysis) झाला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या एका डोळ्याची पापणी लवत नाही. मला या बाजूने हसताही येत नाही आणि या बाजूची माझी नाकपुडीही हलत नाही. मी सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितलंय. ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. असं व्हायला नको होतं, असं मला वाटतं. पण माझं शरीर मला थोडं थांबून आराम करायला सांगतंय. मला आशा आहे, की तुम्ही समजून घ्याल. पुढचा काही वेळ मी विश्रांती आणि आराम करणार आहे, जेणेकरून मी १००% बरा होऊन परत येईन, ज्यासाठी माझा जन्म झालाय. मी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार चेहऱ्याचा व्यायाम करत आहे, जेणेकरून माझा चेहरा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकेल. यासाठी किती वेळ लागेल माहीत नाही. पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे.
> रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय..?
RHS हा एक दुर्मीळ न्यूरॉलॉजिकल आजार आहे. यामध्ये कान, चेहरा वा तोंडावर वेदनादायक पुरळ येत. शिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर पॅरालिसिस होऊ शकतो. यात बहिरेपणादेखील येऊ शकतो. व्हेरिसेला- झोस्टर विषाणूचा (varicella-zoster virus) डोक्याच्या नर्व्ह्जना संसर्ग झाल्यास हा आजार होतो.
Discussion about this post