हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बिग बॉस फेम सातारी अभिजित बिचुकले हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि बोलीभाषेमुळे चर्चेत असतात. बीबी मराठी आणि त्यानंतर अगदी हिंदी हाऊस गाजवल्यानंतर आता बिचुकले निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यास तयार झाले आहेत. मुख्य म्हणजे हि निवडणूक काही सरपंच, आमदार, खासदारकीची नाही बरं का.. तर थेट राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची तयारी बिचुकले करत आहेत. याबाबत अभिजित बिचुकले यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. सोबतच आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
एकीकडे राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. त्यातच निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आता कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरतोय, तुम्ही सही कराल का? अशी विचारणा त्यांनी शरद पवार यांच्याकडे करण्याचे ठरवले आहे.
अभिजित बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले कि, मी राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 100 आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला तर सोपे होईल. काही जवळच्या आमदारांसोबत माझे बोलणे सुरू आहे. मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरतोय, तुम्ही सही कराल का? अशी विचारणा मी त्यांच्याकडे करत आहे. गेल्यावेळी मी पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मला राष्ट्रपती करा अशी मागणी केली होती.
मी बहुजन समाजातील आहे. हुशार आहे. यामध्ये माझा काहीच स्वार्थ नाही. पण महाराष्ट्रातला एक पुरुष पहिल्यांदा राष्ट्रपती बनेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं शिवसेनेशी युती करून जसे महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्याप्रमाणे जर शक्य असेल तर महाराष्ट्रातील एक लढवय्या या नात्याने पवार साहेबांनी मला पाठिंबा द्यायचे ठरवले तर माझे काम एकदम सोपे होईल. यात 288 आमदारांपैकी 100 सह्या मला सहज मिळून जातील, असे बिचुकले यांनी म्हंटले.
Discussion about this post