हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कितीतरी दिवसांपासून सोशल मीडियावर आगामी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या १५ जुलै २०२२ रोजी सर्वत्र सिनेमा गृहात प्रदर्शित होत आहे. काही दिवस आधीच या चित्रपटातील काही गाणी समोर आली होती ज्यांनी प्रेक्षकांना नाद लावला आहे. यानंतर आता फुल्ल जल्लोष आणि उत्साहाचा संचार करणारे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून हे एक रॅप साँग आहे. सध्या या गाण्याची भारी नशा तरुणाईला चढताना दिसतेय.
या गाण्यांमधून अभिनेता सचित पाटीलची या चित्रपटातील ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. गाण्यातला त्याचा डॅशिंग लूक अत्यंत लक्षवेधी आहे. तसेच तो या चित्रपटात एका वृत्त निवेदकाची भूमिका साकारतोय. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देतोय. त्यामुळे हे गाणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच म्हणावे लागेल. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाडका गायक आदर्श शिंदे याने दिला आहे. तर प्रसिद्ध गीतकार क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. याशिवाय प्रसिद्ध संगीतकार अमितराज याने संगीत दिलय तर ‘वाघ आला’चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.
या गाण्याविषयी बोलताना गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणाले कि, “ या चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” याशिवाय संगीतकार अमितराज म्हणाला कि, “आम्ही नेहमीच काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक पात्राला साजेल, असे संगीत आवश्यक असल्याने आम्ही खूप विचार करून संगीत दिले आहे. प्रेक्षकांना आमची कलाकृती नक्कीच आवडेल.”
Discussion about this post