हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत. या वादळात अडचणीत आली आहे ती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची. या सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षा संदर्भात आतापर्यंत अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अनेक कलाकार आणि नेते मंडळींचा समावेश आहे. अशातच २२ जूनच्या संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला सोडून ते मातोश्रीकडे परतले. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. यावेळी त्यांनी आपल्याला पदाची लालसा नाही. मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन, असे सांगितले. यावर आता अभिनेते किरण माने यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने याना राजकीय भूमिका घेण्यावरून मालिकेतून काढून टाकल्याचा त्यानी निर्माते आणि प्रोडक्शन तसेच वाहिनीवर आरोप केला होता. मात्र यानंतरही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसे ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि विविध राजकीय मुद्द्यांवर, विषयांवर त्यांचे मत अगदी बेधडक मांडतात. नुकतंच किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट करीत लिहिलंय कि, ‘अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्या, आक्रस्ताळेपणा करणार्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्याला इतिहास लक्षात ठेवतो.’ याआधी त्यांनी आणखी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये आणखी ३ आमदार जेव्हा शिंदेंच्या चौकटीत गेले तेव्हा ते कशापद्धतीने एअरपोर्टवर पळत होते हे दाखवणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओसोबत मानेंनी लिहिले होते कि, लै हस्तोय च्यायला… ‘आमदार’ या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय. नाय नाय, याआधीबी बंडखोरी झालीय की महाराष्ट्रात. लै वेळा झालीय. पन झालीय तवा खुलेआम झालीय. हितं मराठी मातीत र्हाऊन. तोंडावर. स्वखुशीनं. पन ही काय अवस्था बघतोय ! आरारारारा. भटकी जनावरं धरून कोंडवाड्यात भरावीत तशी अवस्था झालीय एकेकाची. त्या पत्रकारानं लाखात एक प्रश्न इचारलाय, “ऐसा क्या किया आपने जो आप भाग रहे है?”…ते आमदार गेलं खाली मान घालून. हाड तिच्यायला. आपून पाठीचा कना घिवून जन्माला आलोय भावांनो. काम काढून घेतलं तरी असल्या बांडगुळांफुडं झुकलो नाय. तुरूंगात टाकलं तरी चालंल, जीव घेतला तरी चालंल पन आईशप्पत अस्ली भयान अवस्था होऊन देनार नाय सोत्ताची.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/Yz88JWMfvz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 22, 2022
शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेच्याच आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, ‘समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा’. यानंतर राज्यातून अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Discussion about this post