हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कलासृष्टीसाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट समोर आली आहे. लोककलेचा वारसा जपणाऱ्या शिंदे घराण्याने आपल्या कलेने सर्वांचंच मन व्यापलं आहे यात काहीच वाद नाही. भक्तिगीते, भीमगीते, कोळीगीत, कव्वाली, लोकगीते गाणाऱ्या या घराण्याने आता संगीत कलासृष्टीची मान गर्वाने उंचावली आहे. आधीच त्यांचा चाहता वर्ग कधी महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. यानंतर आता नुकतंच शिंदे कुटुंबाचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झाले आहे. याबद्दल विविध स्तरावरून त्यांच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. याबाबत उत्कर्ष शिंदे याने पोस्ट लिहिली आहे.
उत्कर्ष शिंदे याने लिहिले आहे कि, २३ जून २०२२ काल माझे आजोबा स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांची १८ वी पुण्यतिथी आणि कालच जागतिक दर्जाचे वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदेशाही परिवाराचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीच्या यादीत विराजमान झाले. कालच्या दिनी हि सर्वात मोठी आदरांजली मी मानतो. शिंदेशाही परिवाराला हे मिळालेले यश हे फक्त तुम्हा रसिकजना मुळे, आमच्या सोबत काम करणाऱ्या एकूण एक कलाकारामुळे, आमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांचे आहे असे आम्ही मानतो .आम्हाला मिळालेले हे वर्ल्ड रेकॉर्ड कोम्मुनिटीचा मान सन्मान मी सर्व महापुरुषांच्या चरणी सादर करतो. आपण होतात आपण लढलात म्हणून आम्ही घडलो.
गायक आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे हे स्वतः एक उत्कृष्ट पेटीवादक होते. तर त्यांची आजी सोनाबाई तबलावादक होत्या. भगवान शिंदे यांच्या सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी संगीत क्षेत्र निवडले. पुढे प्रल्हाद शिंदे यांनी अनेक गाणी गायली आणि ती गाणी लोकप्रिय झाली. हा संगीताचा वारसा पुढे आनंद शिंदे आणि त्यांची नातवंडे पुढे चालवत आहेत. आनंद शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही गाणी गेली आहेत. तर आदर्शनेही गायलेली गाणी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीवर छाप टाकताना दिसत आहेत.
Discussion about this post