हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका इंडस्ट्रीतील अभिनेता किरण माने हे त्यांच्या अभिनयापेक्षा फेसबुक पोस्टमुळे चर्चेत असतात. कधी राजकीय वादावर किंवा मुद्द्यांवर ते बोलताना दिसतात तर कधी वैयक्तिक विषयी भूमिका स्पष्ट करतात. त्यामुळे अनेकदा नेटकरी त्यांना विविध सल्ले देताना दिसतात. यावेळी एका पेजच्या ऍडमिनने किरण सर, तुम्ही आपल्या पेजवर जातीयवादी पोस्ट करू नका असा मेसेज केला आहे. यावर किरण मानेंनी भली मोठी पोस्ट शेअर करीत चिडचिड व्यक्त केली आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं कि, “किरणसर, तुम्ही आपल्या पेजवर जातीयवादी पोस्ट करू नका.” एका पेजच्या ॲडमीनचा मेसेज आला. … च्यायला ! मी कधी जातीयवादी पोस्ट केली? आनि का करीन?? मी कुठल्या जातीचा द्वेष करत नाय आन् सोत्ताच्या जातीचा कड बी वढत नाय. मी वृत्तीवर ल्हीतो. त्याला इचारलं, “बाबा मी कुठल्या जातीवर ल्हीलंय. लिंक पाठव.” त्यो सारवासारव कराय लागला… ओशाळवानं हसत म्हन्ला..”तसं नाही हो.. तुमी परवा अनाजीपंतांवर लिहीलं होतं, ते जरा…”
मी म्हन्लं, “आरारारारा.. लगा छ. शंभूराजांच्या जीवावर उठलेल्या अनाजीपंताच्या कारस्थानांसंबंधी पोस्ट केली. त्याच्या नीच वृत्तीबद्दल ल्हीलं मी. जातीचा उल्लेख बी नाय. त्याआधीच्या एका पोस्टमधी मी औरंगजेबाचीबी कारस्थानं लिहीलीवती, तवा नाय तुमी ऑब्जेक्शन घेतलं? अनाजीपंतांबरोबरच शंभूराजांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या गद्दारीवरबी लिहीलंय मी. अनाजीपंतच का खटकला? सोयीनं कसं जातीवर घेता तुमी??” …हे असंच सुरू झालंय हल्ली भावांनो. तुमी जातीभेदावर बोलला तरी जातीयवादी ठरता. अजब न्याय हाय. आपलं सोडा, लोकराजा शाहूमहाराजांबद्दल बी हेच झालंवतं. शोषितपिडीतांना न्याय देन्यासाठी त्यांनी जे निर्णय घेतले त्यावरनंबी जातीयवादी ठरवलंवतं त्यांना ! त्यासंदर्भातली एक गोष्ट लैच नादखुळा हाय…
…शाहू महाराज सत्तेवर येन्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन ब्राह्मणांनी अडवल्यावत्या. तो काळच जात उतरंड मानणार्या वर्चस्ववादी लोकांचा होता. महाराजांनी पयलं ते कंट्रोल केलं. खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लायक मानसांना मोठ्या पदाच्या नोकर्या द्यायला सुरूवात केली. याबद्दल ब्राह्मण्यवादी लोकांनी लै लै लै जळफळाट केला. ‘ब्राह्मण्यवादी म्हंजी ब्राह्मण नाही’ हे आधी समजून घ्या बरं का. नायतर परत..तर मूळ गोष्टीवर यिवूया. सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा महाराजांबरोबर रथातनं चाललेवते. बोलताना म्हन्ले, “महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत.”
महाराज तवा गप्प बसले. कायबी बोलले न्हाईत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, “चंदी आन रं.” त्यानं आनलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हन्ले, “बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि ‘लायक’ होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्हायली का नाय? म्हनून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत… मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आनायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला?”
अभ्यंकर ‘ब्राह्मण्यवादी’ नव्हते… विचारी, विवेकी ब्राह्मण होते. त्यांनी लगीच चूक मान्य केली. म्हन्ले, “महाराज, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.” शाहूराजांनी जातीभेद नष्ट करन्यासाठी लै लै लै गोष्टी केल्या… प्रत्येकवेळी वर्चस्ववाद्यांनी त्यांना जातीयवादी ठरवून बदनामी केली. भीमराव आंबेडकर या बुद्धीमान मुलाला हेरून शाहू महाराजांनी त्याला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होन्यासाठी सगळी मदत केली. याच आंबेडकरांनी मोलाचं संविधान आनून जातीभेदावर शेवटचा घाव घातला. पन आजबी लोकांच्या मनातली जात गेलेली नाय भावांनो. वर्चस्ववादी वृत्ती जिवंतच हाय.
जातीभेद नाहीसं करनारं कुनी काही लिहीलं की ‘हा जातीयवादी आहे’ असा कल्लोळ करून बुद्धीभेद करायची ट्रिक हाय भावांनो. आपन त्याला बळी पडायचं नाय. समतेवर बोलतच र्हायचं. न थकता. न घाबरता. …वर्चस्ववाद्यांनी, मनूवाद्यांनी केलेली सगळी बदनामी छातीवर झेलून दुबळ्या, उपेक्षित आणि अस्पृश्यांना आपल्या संस्थानामध्ये नोकऱ्या देणार्या..कामधंदे सुरू करायला वेळ पडल्यास स्वत:च्या खिशातनं पैशांची मदत करनार्या…आपल्याला अनमोल ‘भारतरत्न’ देनार्या…पुरोगामी विचारसरणीची मुळं घट्ट करनार्या राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन ! – किरण माने.
Discussion about this post