हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रातला महाउत्सव म्हणजेच पंढरीची वारी. या वारीमध्ये काय आहे..? तर या वारीमध्ये आहे सुख, समाधान, विठूरायाची भक्ती आणि त्याला पाहण्याची आस, त्याच्या भेटीची ओढ. सारं काही भक्तिमय आणि आनंदमय वातावरण म्हणजे पंढरीची वारी. हा अनुभव अत्यंत विलक्षण आणि मनाला शांती देणारा आहे. दरम्यान महाराष्ट्र भरातून लाखो भाविक या सोहळ्यात जात, धर्म, पंथ विसरून सहभागी होतात. हा चिंतन सोहळा सध्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान यंदा बरेच कलाकार वारीत सहभागी झाले. दीपाली सय्यद, संदीप पाठक, स्पृहा जोशी आणि आता स्वप्निल जोशी. दरम्यान स्वप्निलने पायी वारीत विठुरायाला साकडं घातलयं. वाखरी ते पंढरपूर असा वारीचा प्रवास करून त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर करीत एक फोटोदेखील शेअर केलाय. सोबत तो लिहितो कि, ”मला पांडुरंग असा भेटला ! जय हरी विठ्ठल ! #पाईवारी काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो ! अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली ! कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे ! बघू, पांडुरंग कधी संधी देतो ! पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही ! आम्ही picture मधले hero ! पण खरे हिरो हे वारकरी ! वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पाई वारी चालतात ! पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते ! त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं ! @1OTTofficial @narendrafirodia सर आणि आमच्या टीमने वारी मध्ये जे काम केलं आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, lost and found stalls असतील, ते पाहून खूप आनंद झाला !
पुढे म्हणतो, मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा अभिमान आहे ! लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत ! हा “प्रवास” प्रत्येकाने एकदा तरी करावाच ! माझी आजी म्हणायची…”तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !” काल मला कळलं ती काय म्हणायची ! जय हरी विठ्ठल !” वारीच्या या टप्प्यात स्वप्निल जोशी आणि त्याच्या संपूर्म टीमने वारीचा आनंद घेतलाच. सोबत वारकऱ्यांना अन्नदान केले. त्यांच्या बसण्याची सोय, पाण्याची सोय, पत्राशेड अशी बरीच मदत त्याने आणि त्याच्या टीमने केली. हा सोहळा जगण्याची एक नवी आशा आणि एक नवी उमेद देतो हे आणखी एका कलाकाराने अनुभवातून सांगितले.
Discussion about this post