हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांमध्ये बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. दरम्यान हरहुन्नरी अभिनेता इरफान खान आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना आपण कॅन्सरमुळेच गमावले. बरे झाल्यानंतर पुन्हा कॅन्सरने आपला इंगा दाखवत या दोन कलाकारांना आपल्यापासून दूर नेलं. या सगळ्यात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली बेंद्रेलाही २०१८ मध्ये आपल्याला Metastatic Cancer झाल्याचं निदान झालं होत. यानंतर अमेरिकेत तिच्यावर यशस्वी उपचार झाले आणि आता ती कॅन्सरमुक्त झाली. पण आता पुन्हा एकदा ती त्याच रुग्णालयात गेल्याचे दिसून आले आहे. यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. तिला पुन्हा काही झालं नाही ना..? तर अशा शंका कुशंकांचे निरसन करणारी पोस्ट तिने स्वतः केली आहे.
सोनालीने या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘ही खूर्ची, हा व्ह्यू,आणि हिच ती जागा… ४ वर्षांपूर्वी. इथेच बसून अनुभवली निव्वळ दहशत आणि इथेच मनात जागला आशेचा किरण..खूप काही बदललं आणि खूप काही अजूनही तसंच आहे. या जागी बसून रुग्णांना डॉक्टरच्या केबिनमध्ये जाताना पाहणं..सगळं झपकन नजरे समोरुन गेलं. माझ्यासाठी तो प्रवास खूप कठीण होता. सगळं काही आज पुन्हा पाहिलं,तिच केमोथेरपीची रुम,तोच वेटिंग रुम,आता फक्त चेहरे वेगळे…” सोनालीनं खूप भावूकतेने आपल्या कॅन्सरशी झालेल्या लढ्याचा तो काळ पोस्टमधून मांडला.”मला फक्त कॅन्सर रुग्णांना एवढंच सांगावस वाटतं की हे सगळं फक्त आशेवर अवलंबून असतं.
ती आशा जेव्हा तुमची डळमळेल तेव्हा फक्त माझ्याकडे एकदा पहा,मी तिथे तुमच्या दुसऱ्या बाजूला दिसेन. माझ्यासाठी मी कॅन्सर मुक्त झाले हे कळलं तो दिवस खूप भावूक होता,गोड होता…आनंदाच्या जेवढ्या व्याख्या तुम्हाला माहित असतील तेवढ्या त्या दिवसाला लागू होतात. मी जेव्हा इथून बाहेर पडले,माझ्या मुलाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज होतं आणि मी माझ्याबाबतीत चमत्कार करणाऱ्या त्या दैवी शक्तीला मनोमन धन्यवाद देत होते”.
सोनालीने शेअर केलेल्या या पोस्टसोबत एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो त्या हॉस्पिटलमधील वेटिंग रूममधला आहे. सोनालीने कॅन्सरवर मात करून आपले आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर ती पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे आणि आपल्या कामात व्यग्र आहे. पण आता पुन्हा ती अमेरिकेतील कॅन्सर ट्रीटमेंट घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये दिसून आल्यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तर त्या चाहत्यांसाठी दिलास्याची बातमी म्हणजे सोनालीची तब्येत उत्तम आहे तिला काहीही झालेलं नाही. सोनालीने फक्त आणि फक्त आपल्याला जीवनदान देऊन दुसरा जन्म देणाऱ्या या हॉस्पिटलला भेट द्यायची असे ठरवले होते. म्हणून सोनाली या हॉस्पिटलमध्ये दिसून आली.
Discussion about this post