हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या शुक्रवारी १५ जुलै २०२२ रोजी मराठी सिनेसृष्टीत मोठा ‘तमाशा Live’ होणार आहे. अर्थात संजय जाधव दिग्दर्शित मराठमोळा नवाकोरा चित्रपट नवेकोरे आणि हटके असे कथानक घेऊन रिलीज होतोय. ज्याचे नावच तमाशा Live आहे. या चित्रपटाचे प्रमोशन गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची टीम आणि कलाकार करत आलेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी असे निपुण कलाकार दिसत आहेत. आता अवघे काहीच तास उरले असतानासुद्धा हे सगळेच कलाकार जीव तोडून प्रमोशन करत आहेत. बुधवारी हे कलाकार पुण्यातील मेट्रोत दिसले. यावेळी त्यांनी एक गरमागरम गाणं देखील रिलीज केलं आहे. त्यामुळे चालता बोलता आणि धावता असं हे प्रमोशन सुरु आहे.
सध्या पावसाच्या वातावरणात थोडी उब देणार ‘तमाशा लाईव्ह’च ‘गरमा गरम’ हे गाणं सोशल मीडियावर गाजतंय. हे गाणं पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत रिलीज केले गेले. त्यामुळे चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी हा एकदम तमाशा Live गरमा गरम परफॉर्मन्स ठरला आहे. याबाबत कलाकारांनी आधीच सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यामुळे मेट्रो स्थानकावर आधीपासून चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. यावेळी चित्रपटातील शेफाली म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. तर ‘गरमा गरम’च्या गायिका वैशाली सामंत यांनी गाणं गात उपस्थितांसोबत ठेका धरला. एकंदरच मेट्रो स्थानकात सगळे जण हॉट फिलिंगचा अनुभव घेत होते.
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात विविध ढंगातील गाण्यांची मेजवानी आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र याची जोरदार चर्चा आहे. याआधी नंदी, रंग लागला, कडक लक्ष्मी या, फड लागलाय या गाण्यांनी प्रेक्षकांना मोहून टाकले होते. यानंतर आता या ‘गरमा गरम’ गाण्यावर देखील चाहते फिदा झाले आहेत. दरम्यान कलाकारांसह चित्रपटाच्या टीमने मेट्रो स्थानकात प्रवाशांना तिकीट वाटपही केले आणि त्यांच्यासोबत संवादही साधला.
याबाबत बोलताना संजय जाधव म्हणाले कि, प्रेक्षकांच्या, प्रवाशांच्या उपस्थितीत, ‘गरमा गरम’ हे गाणे मेट्रो स्थानकात प्रदर्शित होणे, ही आनंद देणारी गोष्ट आहे. प्रमोशनचा हा एक वेगळा प्रकार आहे. यामुळे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या थेट प्रतिक्रिया मिळतात. ‘तमाशा लाईव्ह’ हा खऱ्या अर्थाने वेगळा चित्रपट आहे. आजच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, चित्रपटालाही असाच भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.”
Discussion about this post