हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय क्विझ शो म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. या कार्यक्रमात ज्ञानाची कसोटी लागते तर एखाद्या सामान्य व्यक्तीचे स्वप्न असामान्यरित्या पूर्ण होते. त्यामुळे हा शो प्रत्येकासाठी खास आहे. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ खेळण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. पण या शोच्या प्रत्येक पर्वात विशेष भागांची योजना आखलेली असते. तर यावेळी विशेष भागात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता तसेच आघाडीचा दिग्दर्शक प्रसाद ओक सहभागी होणार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे या भागात एक खास व्यक्ती देखील उपस्थित राहणार आहे. ज्या पद्म पुरस्कृत असून त्यांच्या येण्याचे शोला चार चांद लागणार आहेत.
हि खास व्यक्ती म्हणजेच पद्मश्री राहीबाई पोपेरे. या शनिवारी अर्थात २३ जुलै २०२२च्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या प्रसाद आणि प्राजक्तासोबत उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बसलेले प्रसाद आणि आणि प्राजक्ता जेव्हढी किंमत जिंकतील ती ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले’ या संस्थेला मदत म्हणून देण्यात येईल. इतकंच नाही तर सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय हास्य शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट हेदेखील या भागात उपस्थित राहणार आहेत.
या आठवड्यात विशेष भागासाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि हास्यजत्रेचे हास्यवीर असा संगम लाभल्याने शोच्या एपिसोडची रंगात भारीच वाढणार आहेत. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने राहीबाईंनी बीज बँकेचा विस्तार सुरू केला आहे. बियाणांच्या बॅंकेची सुरुवात ते पद्मश्री पुरस्कार हा प्रवास राहीबाई यात सांगतील. तर हास्यवीर पडद्यामागचे अनेक किस्से सांगताना दिसतील.
Discussion about this post