हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्याचं राजकारण एखाद्या नाटकापेक्षा काही कमी नाही. या नाटकाचा अनपेक्षितपणे आपणही एक भाग आहोत याची खंत राज्यातील प्रत्येकाला वाटत आहे. पण आपली खंत, राग आणि द्वेष मोकळेपणाने व्यक्त होणारे फार कमी लोक आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सुबोध भावे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजकारण आणि त्याला कारणीभूत असलेल्या राजकारण्यांवर सडकून टीका करीत ताशेरे ओढले आहेत.
अभिनेता सुबोध भावे यावेळी शिक्षक, पालक आणि देशाचं भवितव्य घडविणाऱ्या पुढील पिढीसमोर बोलत होते. ते म्हणाले कि, ‘आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन सतत करियरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलं आहे याचीच खंत वाटते. त्याचबरोबर ‘आपल्याला असं वाटतंय की ते जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील.. पण त्यांनी मागच्या काही वर्षांत जे काही करुन ठेवलंय ते आपल्या समोर आहे.’
सुबोध भावे यांनी राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरही चांगले खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले कि, स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसं आता होताना दिसत नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभं करणं गरजेचं आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणून ‘मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत’, अशी वक्तव्ये करण्यात काही राजकारणी धजावतात.’
Discussion about this post