हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा काही कमी नाहीत. त्यामुळे अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विविध स्टंट आणि ऍक्शन सीन स्वतःहून करतात. यामध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ आणि तब्बू अशा आईंक अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. बुधवारीच अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिच्या आगामी सीरिजच्या शूट दरम्यान स्टंट करताना अपघात झाला आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. यानंतर आता अभिनेत्री तब्बू तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग सेटवर जखमी झाली असून तिच्या डोक्याला आणि डोळ्याला दुखापत झाल्याचे समजत आहे.
अभिनेत्री तब्बू हि अजय देवगणसोबत ‘भोला’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती स्टंट करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूट हैद्राबाद येथे सुरु आहे. कथेच्या गरजेनुसार शुटींगदरम्यान एका घनदाट जंगलातून तब्बु ट्रक चालवत होती आणि काही चोर तिचा पाठलाग करत होते. यात एका चोराच्या दुचाकीचा धक्का ट्रकला लागला. यावेळी तब्बुला गाडी आवरणं कठीण झालं आणि ट्रकची काच फुटून तिला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तब्बूला झालेल्या अपघाताविषयी सोशल मीडियावर माहिती पसरली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या काचेच्या तुकड्यानं तब्बुच्या डोळ्याला दुखापत झाली असून सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही. तब्बूला झालेली दुखापत पाहताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरु केले आहेत.
यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजी करण्याचे कारण नसून आता ती सुखरुप आहे. या चित्रपटात तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते आहे. याआधी देखील तब्बूने अनेक ऍक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे. त्यामुळे स्टंट तब्बूसाठी नवीन नाहीत फक्त यावेळी थोडी वेळ खराब होती असे म्हणावे लागेल.
Discussion about this post