हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कवी, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा आज वाढदिवस आहे. दिनांक २४ ऑगस्ट १९७७ रोजी त्यांचा जन्म सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यात जेऊर गावी झाला. त्यांचा जन्म हा वडार समाजातील आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून त्यांचा प्रवास सुरु झाला.
आपण कोण आहोत..? काय आहोत..? हे समजण्याची कुवत प्रत्येकात असते पण तरीही फार कमी लोक हि प्रतिभा वापरू शकतात. यांपैकी एक ठरले नागराज मंजुळे. मराठी सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण करून त्यांनी आज प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायमस्वरूपी पक्की केली आहे. आज ते आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तर जाणून घेऊया प्रेक्षकांशी नाळ जोडलेल्या या अवलियाविषयी काही खास गोष्टी…
कोवळ्या १९ व्या वर्षी लग्न करून शिक्षण आणि संसार अशा दोन्ही जबाबदाऱ्या नागराज अण्णांच्या खांद्यावर आल्या. यावेळी ते १२’वीत शिकत होते. लग्नाच्या सुमारे १५ वर्षानंतर त्यांनी २०१२ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि २०१४मध्ये ते विभक्त झाले. वडार समाजात शिक्षणाचे तसे प्रमाण अत्यंत कमी.. मात्र नागराज यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण आवर्जून घेतले. पुढे ते पुणे विद्यापीठात शिकायला आले.
त्यांनी मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल.चे शिक्षण पूर्ण केले. इतकेच काय तर नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा २ वर्षीय कोर्ससुद्धा केला आणि यादरम्यान त्यांनी प्रोजेक्टचा भाग म्हणून ‘पिस्तुल्या’ हा पहिला लघुपट तयार केला. या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. इथून सुरु झाली मंजुळेंची सिनेसृष्टीतील वाटचाल…
सध्या सिनेसृष्टीत नव्याने रुजू झालेल्या किंवा काम करू पाहणाऱ्या तरुणांना नागराज मंजुळे हे केवळ नावदेखील प्रेरणा देत आहे. कारण समाज भान राखून सामाजिक विषयावर लिहिणारे आणि कलाकृती साकारणारे मंजुळे अनेक मुक्यांचा आवाज झाले. ज्या विषयांवर लोक बोलणंही टाळतात अशा विषयांना हात घालत त्यांनी अनेक कलाकृती बनविल्या आणि त्यांना समाजाने मान्यताही दिली.
यात शाळेत जाण्यासाठी इच्छुक दलित मुलांची इच्छा मारणारे कुटुंब आणि समाज.. तसेच जातीजमातींविषयी समाजात असलेला द्वेष, एखाद्याच्या वर्णावरून त्याचा केला जाणारा तिरस्कार याबाबतीत असमर्थ असणाऱ्या समाजाचं पितळ मंजुळेंनी उघड पाडलं.
मंजुळे अण्णांचा पहिला चित्रपट फॅंड्री. जो १४ फेब्रुवारी २०१४ साली प्रदर्शित झाला होता. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर असा त्याचा अर्थ. फक्त १.७५ करोड इतकं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७ करोडची कमाई केली आणि एक नवं पर्व सुरु झालं. ज्या पर्वाचं नाव नागराज मंजुळे आहे. यानंतर अण्णांचा दुसरा चित्रपट ‘सैराट’ २९ एप्रिल २०१६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडला.
सैराटमधील गाणी, सर्वसामान्य वाटणारे आपल्यातलेच कलाकार आणि कथानक चांगलंच गाजलं. हा चित्रपट अनेकांचं नशीब बदलून गेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११० करोडची कमाई केली आणि एक वेगळीच गरुडझेप अण्णांनी घेतली.
यानंतर १६ नोव्हेंबर २०१८ साली ‘नाळ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि यानंतर अण्णांची नाळ कायमची सिनेसृष्टीशी जोडली गेली.
त्यांचा ‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ हा कवितासंग्रहदेखील प्रकाशित झाला आहे. या काव्य संग्रहाला २०११ मध्ये भैरूतन दामाणी साहित्य पुरस्कार, पुढे २०१४ मध्ये नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार जाहीर झाला होता. विशेष म्हणजे नागराज यांची ‘पिस्तुल्या’ ही शॉर्ट फिल्म येण्याआधी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. त्यांच्या या कवितासंग्रहातील अनेक कविता खूप प्रसिद्ध आहेत.
यानंतर अलीकडेच नागराज यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. बॉलिवूडच्या महानायकासोबत त्यांनी आपला पहिला हिंदी चित्रपट केला. ज्याचं नाव ‘झुंड’ असं आहे. दिनांक ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखांवर आधारित होती. यामध्ये अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत तर सैराट फेम रिंकू राजगुरू, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात दिसले.
असा हा अवलिया … कधी कवी, कधी लेखक, कधी अभिनेता तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर आला. विविध पुरस्कारांनी त्यांचा अनेकदा सन्मान झाला. पण खरा सन्मान तोच.. जेव्हा नागराज पोपटराव मंजुळे हे नाव कायमच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं.
‘का तू ऊन्हाच्या कटाविरुध्द,
गुलमोहरासारखं त्वेषानं फुलत नाहीस…’ असं म्हणत नागराज अण्णा सिनेसृष्टीचा एक अविभाज्य घटक झाले आहेत. काट्याच्या पायवाटेवरून चालून, थोडं घायाळ होऊन आज मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही सिनेसृष्टीत नागराज मंजुळे घट्ट पाय रोवून उभे आहेत.
अशा या अवलियाला.. आणि सिनेसृष्टीच्या भविष्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Discussion about this post