हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर येत्या काळात आपल्या प्रेक्षकांसाठी एक भन्नाट गिफ्ट घेऊन येत आहेत. या माध्यमातून जिओ स्टुडिओजदेखील मराठी डिजिटल विश्वात पदार्पण करीत आहे. एक नवा प्रयोग, एक नवी गोष्ट आणि ओळखीचे कलाकार. ‘एका काळेचे मणी’ नावाची एक धमाल वेबसिरीज आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. ही गोष्ट एका चित्र-विचित्र मध्यम वर्गीय फॅमिलीची आहे. यातला प्रत्येकजण वेगळा आणि क्रेझी आहे. यांची ही आगळी वेगळी गोष्ट कधी हसवेल तर कधी रडेवल, पण १००% मनोरंजन घडवेल अशी आहे.
मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या विनोदी सिरीजची निर्मिती केली आहे. तर अतुल केरकर यांनी दिग्दर्शन केलंय. तसेच या मालिकेची संकल्पना ऋषी मनोहर यांची आहे आणि लिखाण ओम भूतकर यांनी केले आहे. या सिरीज मध्ये आपल्याला मराठी नाटकक्षेत्राचे सुपरस्टार आणि लोकप्रिय सिने अभिनेता प्रशांत दामले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासह अभिनेत्री हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर आणि ऋषी मनोहर तसेच रुतुराज शिंदे इत्यादी प्रतिभावान कलाकारदेखील असणार आहेत. मुख्य सिरीज मध्ये धमाल आणायला हास्यवीर कॉमेडीस्टार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार देखील यामध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
आपल्या या आगळ्या वेगळ्या धमाल प्रयोगाविषयी निर्माते महेश मांजरेकर व्यक्त झाले आहेत. ते म्हणाले की, ‘मला आनंद आहे की आम्ही ‘एका काळेचे मणी’ या वेबसिरीजची निर्मिती केली. प्रत्येक पालकांची इच्छा असते की, त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखे मोठे व्हावे आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवावी. पण या मालिकेत इथेच खरी गंमत सुरु होते कारण सध्याच्या जनरेशनच्या आवडीनिवडी या भन्नाट, वेगळ्या असतात आणि त्यामुळेच आपल्या दैनंदिन आयुष्यात एका विरोधाभास आणि धमाल निर्माण होते. आणि हीच जुन्या विरूद्ध नव्या विचारांची गंमत जंमत या मालिकेत आपल्याला दिसणार आहे.’
Discussion about this post