हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. घराघरात बाप्पाचं डेकोरेशन सुरूय. गावागावात मंडळांत पोरं गणपतीच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. अशात एका लहानग्यांने थेट गणपती बाप्पाला लिहिलेलं पात्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.
बाप्पा तू कधी येणार? मी तुझी वाट पाहतोय असं म्हणत या चिमुकल्यानं येताना तू भरपूर झोप काढून ये असं बाप्पाला म्हटलंय. तू आमच्याकडं आलास कि इकडं तुला कोणीच शांत झोपू देणार नाही. ढोल ताशा अन गाण्यांच्या आवाजानं तुला झोपच येणार नाही असं म्हणत या लहानग्यांन काळजीपोटी बाप्पाला सरळ चांगली झोप काढून मगच ये असं सुचवलंय.
सध्या हे पत्र सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालं आहे. स्वराज हणमंत चव्हाण असं या बाप्पाला पत्र लिहिलेल्या लहानग्याचं नाव असून तो कराड तालुक्यातील कोळे या गावाचा रहिवासी आहे. इथे खाली आम्ही संपूर्ण पात्र जोडले आहे. मुद्दामहून त्यात काही बदल न करता लहानग्याच्याच शब्दात ते ठेवले आहे.
तू कधी येणार. मी तुझी वाट बघतोय. आई तुझ्यासाठी मोदक करणार आहे. तुला मोदक आवडतात ना? तुझा मोक्षक घेऊन ये बरं का येताना. तुला आणताना तुला वरती लाल कापड घालून आणतो ना ते कापड मी आईला धुवायला सांगितलं आहे.
बरं ते सोड..मला सांग तू आराम केलास का? कारण आमच्याकडे आलास कि तुला कोण झोपू देत नाही. सगळेचजण ताशा वाजवतात अन गाणी लावतात. त्यामुळे तुला आमच्याकडे झोप कशी लागणार? तीनशे पासष्ट दिवस मनात अन अकरा दिवस आमच्या घरात एवढ्या सगळ्या लोकांच्या इच्छा तू कशा पूर्ण करतोस? तू तर एकटाच आहेस अन इच्छा मात्र किती? तुला कंटाळा नाही का रे येत?
बरं मी आता खूप बोललो आता मला काम आहे. नंतर तू आलास कि बोलतो. आणि थांब मित्रा..माझी एक इच्छा आहे. तू आता आमच्याकडे कायमचा येणार हा. आता मी जातो.
Discussion about this post