हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | मराठी मालिका क्षेत्रातील प्रचंड चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेता किरण माने. ते नेहमीच काहीना काही कारणामूळे गॉसिप्सचा विषय ठरतात. वाद विवाद तर त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ. स्टार प्रवाह वरील गाजलेली मालिका ‘मुलगी झाली हो’चे प्रकरण तर तुफान चर्चेत राहिले होते. यामध्ये फक्त सेलिब्रिटी नाही तर राजकीय नेत्यांनी सुद्धा उड्या घेतल्या होत्या. याशिवाय किरण मानेंच्या लेखणीला कमालीची धार आहे. त्यांचा एक अन् एक शब्द नेटकरी उचलून धरतात. किरण माने नेहमीच नवं नव्या विषयावर अत्यंत धिटाईने लिहीतात. कधी केंद्र सरकारला धारेवर धरतात तर कधी राजकीय विधाने करत असतात. यामुळे अनेकदा वादाची वादळे यांच्या भोवती फिरताना दिसतात. असं हे वादांनी घेतलेलं व्यक्तिमत्व लवकरच बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तसं बिग बॉसचं बोलावणं आलंय त्यांना..
आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे एकूण तीन सिझन झाले आहेत. मुख्य म्हणजे हे तीनही सिझन कमालीचे लोकप्रिय ठरले. त्यानंतर आता उत्सुकता आहे ती आगामी चौथ्या सिझनची. हे आगामी चौथे पर्व येत्या २ ऑक्टोबर २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच याही सिझनचे सूत्रसंचालन वन अँड ओन्ली महेश मांजरेकर करणार आहेत. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा बिग बॉसचा खेळ फारच लोकप्रिय आहे. नेहमीच नव्या सिझनमध्ये कोण सहभागी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यामुळं आता हा चौथा सिझन सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक असल्याने उत्सुकता आणखीच वाढली आहे. या स्पर्धकांच्या लिस्टमधील काही नाव समोर आली आहेत. ज्यामध्ये किरण माने हे नाव सामील आहे.
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात मराठी अभिनेते किरण माने यांना विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी किरण माने ही ऑफर स्विकारायची का नाही याबाबत विचार करत आहेत. तर दुसरीकडे या शोचे निर्माते किरण मानेंना या शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’ त्यामुळे आता एकच होकार किंवा नकाराची प्रतिक्षा आहे. किरण माने या नावाशिवाय प्राजक्ता गायकवाड, नेहा खान, हार्दिक जोशी, ओंकार शिंदे, अनिकेत विश्वासराव, निखिल चव्हाण, यशोमान आपटे, माधव अभ्यंकर यांनाही विचारणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप वाहिनीने यांपैकी कोण बिग बॉसच्या घरात दिसेल याबाबत खुलासा केलेला नाही.
Discussion about this post