हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | आजकाल टिव्हीवरील मालिका, थिएटरमधील चित्रपट यापेक्षा जास्त ओटीटीच्या वेब सीरिज आणि शोचा प्रेक्षकांवर जास्त प्रभाव आहे. कारण कोरोनाच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ओटीटीचा मोठा सहभाग होता. त्यामूळे आता तर नवे प्रदर्शित होणारे चित्रपटसुध्दाकाही काळातच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात. म्हणून थिएटर मध्ये जाणारा प्रेक्षक वर्गदेखील कमी झाला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात ओटीटीने घडवून आणलेला हा बदल सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो आहे. या प्लॅटफॉर्मवरील काही मालिकांचा प्रभाव चांगला जबरदस्त असतो. जसं की, सेक्रेड गेम्स, द फॅमिली मॅन, मिर्झापूर आणि गुल्लक. म्हणूनच या मालिकांचे कौतुक करण्यासाठी फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये गुल्लक या सिरिजने तब्बल ५ पुरस्कार पटकावले आहेत.
टीव्हीएफच्या दर्जेदार मालिकांचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आहे असे दिसून आले आहे. त्यात कोटा फॅक्टरी, पिचर्स आणि गुल्लक या मालिकांनी बाजी मारली आहे. गुल्लक या मालिकेत आपल्याला आपलीच वाटेल अशी एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटूंबाची गोष्ट सादर करण्यात आली आहे. यामुळे ही मालिका लोकांनी डोक्यावर उचलून घेतली आहे. यानंतर आता या मालिकेवर फिल्मफेअर अवॉर्डमध्ये कौतूकाचा वर्षाव झाला आहे. 2021 च्या फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डमध्ये गुल्लकने 5 पुरस्कार पटकावले आहेत. त्यामूळे सोशल मीडियावर गुल्लकवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झालाय. टीव्हीएफ निर्मित या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी याच निर्मात्यांच्या पंचायत मालिकेने अशी कौतुकास्पद कामगिरी केली होती. पंचायतला बेस्ट कॉमेडी सीरिजचा पुरस्कार मिळाला होता.
सध्या सोशल मीडियावर गुल्लक मालिकेचे चाहते आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच गुल्लकमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता वैभव राज गुप्ता याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याबाबत त्याने स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर करुन त्यासंबंधीची माहिती चाहत्यांना दिली आहे. यामधे त्याने लिहिले आहे की, ‘ 2013 पासून माझा टीव्हीएफसोबत प्रवास सुरु झाला. त्या दरम्यान अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यात मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. धन्यवाद..! याशिवाय अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार पटकावला आहे.
Discussion about this post