हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणी म्हणजे महाराष्ट्राची आन बान आणि शान. लोककलेचा जिवंत वारसा असणाऱ्या लावणीची एक वेगळीच उंची आहे. हि उंची तयार करणाऱ्या अनेक कलावंतांचा ठिकठिकाणी मोठमोठ्या उत्सव, कार्यक्रमात आदर सत्कार केला जातो. अशा लोककलेला ज्वलंत ठेवणाऱ्या लावणीसम्राज्ञी गुलाब बाई संगमनेरकर यांची निधन वार्ता आली आहे. अतिशय दुःखद आणि मनाला बोचणारी हि बातमी ऐकून अनेक कलावंतांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या ९० व्या वर्षी लावणीसम्राज्ञी गुलाब बाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यात राहत्या घरी आज १४ सप्टेंबर २०२२ रोजी, दुपारी १२.३० वाजता त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुलाब बाईंच्या पश्चात दोन मुली, नातवंड आणि जावई असा परिवार आहे. तर कलावंतांचा एक मोठा परिवार त्यांनी जोडलेला आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा त्यांची लावणी परंपरा पुढे नेण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होता. यानंतर आता त्यांची मुलगी लावणीसम्राज्ञी वर्षा संगमनेरकर लावणीची परंपरा पुढे नेत आहे. गुलाब बाईंच्या निधनामूळे लोककलेच्या क्षेत्रात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
वयाच्या सातव्या वर्षी पायात घुंगरू बांधून लोककलेचा वसा घेतलेल्या गुलाबबाई लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये फड गाजवीत असे. त्यांनी गावोगावी, शहरोशहरी तमाशाचे अनेक कार्यक्रम केले. संगीतबारी हा त्यांच्या परंपरेचा प्राकृतिक पिंड होता. मात्र तमाशा बंद असेल तेव्हा त्या संगीतबारी करीत. गुलाबबाईंनी लावणीला दर्जा देत कथ्थकची जोड दिली. त्यांनी शास्त्रोक्त लावणी प्रकार केला. त्यांची खरी कारकीर्द खानदेशात घडली. लता मंगेशकरांनी ‘आजोळची गाणी’ हा अल्बम केला तेव्हा ‘राजसा जवळी जरी बसा, जीव हा पिसा’ या बैठकीच्या लावणीवर भावकाम आणि अदा करण्यासाठी गुलाबबाईंना बोलावणे आले होते.
गुलाबबाईंसाठी बैठकीची लावणी म्हणजे नुसता डाव्या भुवईचा खेळ. त्यात स्वतःतच एक परिपूर्ण अदाकारा होत्या. बैठकीच्या लावणीचं त्यांचं घराणं गोदावरीबाई पुणेकरांचं आहे. त्यामुळे गाण्यापासून भावकामापर्यंत गोदावरीबाईंनी लहानपणीचे जे शिकवलं, ते गुलाबबाईंनी आपल्यात रुजवलं आणि वाढवलं. गुलाब बाईंना २ वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर’ यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. लावण्यवती गुलाबबाई संगमनेरकर शरीराने नाहीत याचे दुःख मोठे आहे मात्र त्यांनी मागे ठेवलेला लावणीचा ठेवा आणि शास्रोस्त्र कलेची उपासना यात त्या चिरंतर असतील.. लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Discussion about this post