हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या महाराष्ट्रात सगळ्या वहिनींना ठाऊक असलेले भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर. झी मराठीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ‘होम मिनिस्टर’ या मालिकेतून बांदेकर घराघरात पोहोचले. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आदेश बांदेकर यांनी मनोरंजन विश्वाशी नाते घट्ट ठेवले. बांदेकर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील चांगलेच अग्रेसर आहेत. यामुळे भाऊजी आता फक्त वहिनींचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके ठरले आहेत. गेली कित्येक वर्षे सातत्याने ते ‘होम मिनिस्टर’च्या माध्यामातून महाराष्ट्रातील स्त्रियांचा सन्मान करत आहेत. नुकतेच या कार्यक्रमाला तब्बल १८ वर्षे पूर्ण झाली आणि या निमित्ताने बांदेकरांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.
झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आदेश बांदेकर यांच्यासोबतच ‘होम मिनिस्टर’ शोचे पडद्यामागील कलाकार देखील दिसत आहेत. यावेळी बांदेकर काहीसे भाऊक होत म्हणतात कि, ‘आमच्या सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण. कारण १३ सप्टेंबर २००४ हा दिवस कधी इतका मोठा इतिहास घडवेल असं वाटलं नव्हतं. फक्त १३ दिवसांसाठी सुरु झालेला हा कार्यक्रम आणि आज १३ सप्टेंबर २०२२ ला त्याला १८ वर्ष पूर्ण होत आहेत. मी भाग्यवान की महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन ही आनंदयात्रा आणि या आनंदयात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं. जी जी स्वप्न पाहिली होती, ती सगळी पूर्ण झाली.’
पुढे म्हणाले कि, ‘या कार्यक्रमानं वेगळा आशीर्वाद दिला. हे मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि अर्थात माझ्याबरोबर असणाऱ्या असंख्य पडद्यामागचे कलाकार यांचे आभार. झी मराठीचे खूप खूप धन्यवाद. जगाच्या नकाशावर रोज एका कुटुंबाला बोलतं करणारा आणि इतकी वर्ष चालणारा एकही कार्यक्रम नाही.’ यावेळी बांदेकरांनी होम मिनिस्टर’साठी गेली १८ वर्ष काम करणारे स्पॉट बॉय मिथिलेश यांच्या हातून केक कापला. शिवाय संपूर्ण टीमचं कौतुक करत म्हणाले की, ‘कोरोना काळात कार्यक्रम बंद होता, तरीही ही टीम इथेच राहिली. दुसरीकडे गेली नाही. त्यांना विश्वास होता कि आपला कार्यक्रम पुन्हा सुरू होईल.’ आदेश बांदेकरांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने होम मिनिस्टर हा कार्यक्रम अनुभवला. शिवाय आपण मुख्य भूमिकेत असूनही त्यांनी पडद्यामागील कलाकारांना दिलेला मान आणि त्यांचे केलेले कौतुक पाहून नेटकऱ्यांनी बांदेकरांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Discussion about this post