हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित बालनाट्य ‘अलबत्या गलबत्या’ लहान मुलांसह मोठ्यांनाही भावलं. या नाटकातील चिंचि चेटकिणीने तर साऱ्यांची मन जिंकली आहेत. शिवाय नाटकातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगले पसंतीस उतरले आहे. मात्र चिंचि चेकटकिणीवर प्रेक्षकांनी थोडं जास्त प्रेम केलं. हे पात्र मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता वैभव मांगले साकारत होते. होते म्हणण्याचे कारण असे कि, अलीकडेच त्यांनी अलबत्या गलबत्या नाटकाला रामराम केला आहे आणि यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आता दुसऱ्या कलाकाराने त्यांची जागा घेत चिंचि चेटकिणीच्या पात्राला जिवंत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र वैभव यांनी नाटक का सोडले..? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
अभिनेता वैभव मांगले यांचा ‘टाइमपास 3’ हा सिनेमा चांगलाच गाजला. याशिवाय ते झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमात चिंची चेटकीणीची भूमिका साकारताना दिसले आहेत. वैभव यांना ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली आणि तरीही त्यांनी हे नाटक सोडले. हि बाब प्रेक्षकांच्या पचनी काही पडली नाही. इंडस्ट्रीत चालू कुजबुज पाहता निर्माता राहुल भंडारे यांच्याशी वैभव मांगले यांचे काहीतरी बिनसले असल्याचे म्हटले जात आहे. वैभव मांगले यांनी नाटक सोडताना एक पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टमध्ये वैभव यांनी लिहिले होते कि, ‘प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ‘ती मी नाहीच’. या पोस्टनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
अद्वैत थिएटर निर्मित हे नाटक तुफान गाजत असताना वैभव यांनी नाटक सोडले आहे. अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे आणि मांगले यांच्यात वाद झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. मात्र याबाबत वैभव मांगले आणि निर्माते राहुल भंडारे यांपैकी कुणीही आपली नाराजी व्यक्त केलेली नाही.
‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याने अनेक विक्रम मोडून काढले. चिंचि चेटकिणीला भेटायला चिमुकल्यांची नुसती झुंबड उडायची. मात्र आता चिंचि चेटकीण बदलल्यामुळे सगळंच बदललं आहे असं वाटू लागलंय. माहितीनुसार, निर्मात्यांनी हे नाटक पुढे चालवण्यासाठी वैभव मांगले यांनी साकारलेल्या चिंची चेटकीण या पात्रासाठी नवा अभिनेता शोधून काढला आहे. या नव्या चिंचि चेटकिणीचे नाव अभिनेता निलेश गोपनारायण असे आहे. नीलेशचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक असून तो थेट वैभव यांच्या पात्राची कमतरता भरून काढण्यास सज्ज झाला आहे. पण याचा नाटकावर काय परिणाम झाला..? असे विचाराल तर प्रेक्षकांनी नव्या चेटकिणीचेदेखील उत्साहाने स्वागत केले आहे आणि कौतुकाचा वर्षाव देखील केल्याचे पहायला मिळाले आहे.
Discussion about this post