हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे मालिका विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. निशी सिंह यांनी ‘हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये विविध भूमिका अव्वलरित्या साकारल्या होत्या. यामुळे त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री निशी सिंह यांना मे महिन्यात पक्षाघाताचा झटका आला होता. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्याचे दिसून आले. यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांना घशाचाही गंभीर संसर्ग झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांना काहीही खाता येणे अवघड झाले होते. अशावेळी त्या केवळ द्रवपदार्थांचे सेवन करू शकत होत्या. त्यांची प्रकृती पाहता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीच बिघडली आणि अखेर आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी निशी सिंह यांनी आपला ५० वा वाढदिवस साजरा केला होता. हि माहिती निशी सिंह यांचे पती, लेखक आणि अभिनेते संजय सिंह भादली यांनी दिली. मात्र निशी सिंह यांच्या अचानक एक्झिट घेण्यामुळे त्यांच्या आयुष्याची घडली विस्कटल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘कुबूल है’ मालिकेतील निशी यांची हसीना बीवी हि भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांनी प्रसिद्ध मालिकांसोबत चित्रपटातही काम केले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या माघारी पती आणि दोन मुले असा परिवार आहे.
Discussion about this post