हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या लहानपणी सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आणि गाजलेली मालिका म्हणजे ‘शक्तीमान’. या मालिकेतून घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना हे सध्या चित्रपटांपासून फार दूर आहेत. पण तरीही सारखे चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे युट्युब चॅनेल. होय. मुकेश खन्ना त्यांच्या युट्युब चॅनेलवर त्यांचे विचार व्यक्त करत असतात आणि यामुळे ते अनेकदा चर्चेत येतात. काहीवेळा ते ट्रोलसुद्धा होतात. नुकताच त्यांनी बॉलिवूडच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी कलाकारांच्या वागणुकीबद्दल हे भाष्य केले आहे जे चर्चेत आले आहे.
अभिनेता मुकेश खन्ना हे अनेकदा त्यांच्या विचारांवरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येताना दिसतात. मात्र ते आपला स्पष्ट वक्तशीरपणा सोडत नाही. याहीवेळी ते जरा स्पष्टच बोलले आहेत. त्यांनी अतिशय खुलेपणाने बॉलिवूड कलाकारांच्या वागणुकीवर भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर शेअर केलाआहे. या व्हिडीओमध्ये मुकेश बोलताना दिसतात कि, ‘सेलिब्रिटींनी थोडं विचार करूनच बोलावं आणि वागावं. सोशल मीडियामुळे कलाकार आणि सर्वसामान्यांमधील अंतर कमी झालं आहे. यामुळेच अनेकदा आपलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही तर त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो.’
यानंतर पुढे चित्रपट कलासृष्टीतील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘एक काळ असा होता जेव्हा लोकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल फक्त मॅगझिन वा मुलाखतीतून कळायचं. पण आता हे स्टार्स सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. त्यामुळे फक्त पडद्यावर चांगले काम करणे पुरेसे नाही. कलाकारांनी बेजबाबदार विधानं करू नयेत. शिवाय आपण काय वागतोय याचेही भान त्यांनी ठेवावे. कारण ते थेट लोकांशी संबंधित असतात. त्यांनी काहीही बोलण्यापूर्वी नीट विचार केला पाहिजे. कारण लाखो लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. सेलिब्रिटींचं एक विधान मोठ्या संख्येने लोकांवर परिणाम करू शकतं,’. एकंदरच काय कि, यावेळी मुकेश खन्ना यांनी कुणाचे मन दुःख केलेले नाही तर कुणाचे मन दुखवू नका असा सल्ला सेलिब्रिटींना दिला आहे.
Discussion about this post