हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गाजलेला आणि लक्षात राहिलेला एव्हरग्रीन धमाल कॉमेडी चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवा बनवी’. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला ना.. तरीही मन भरत नाही. एव्हाना कित्येकांचा हा चित्रपट तोंडपाठ झाला असेल पण चित्रपटावरील प्रेम मात्र दिवसागणिक वाढतच आहे. हा चित्रपट म्हणजे मराठीतील मास्टरपीस म्हणावा लागेल. या चित्रपटातील कलाकार, त्यांनी रंगवलेली पात्र, गाणी, डायलॉग सगळं कसं कमाल आहे. या चित्रपटाने आज तब्बल ३४ वर्ष पूर्ण केली आहेत. गेल्या इतक्या वर्षात चित्रपटाचा प्रभाव एकही अंश कमी झालेला नाही. या खास दिनाचे औचित्य साधत झी टॉकीजने सोशल मीडियावर चित्रपटाबाबत पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना आपल्या आठवणी शेअर करण्याची संधी दिली आहे. यावर प्रेक्षकांनीही उदंड प्रतिसाद दिला आहे.
‘अशी ही बनवाबनवी’ ३४ वर्षांपूर्वी २३ सप्टेंबर १९८८ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. एक निखळ विनोदी चित्रपट आणि तितकाच कितीही वेळा पाहिला तरी ताजा वाटणारा अशी हि कलाकृती आहे. सुधीर, परशुराम, शंतनू , माधुरी, मनीषा, कमळी, बळी, लीलाताई काळभोर, तानी, छबुराव, अतिशय लहान भूमिका असली तरीही लक्षात राहिलेली सुधीर जोशी यांची विश्वास सरपोतदार ही भूमिका आणि अशोक सराफ यांनी वठवलेला धनंजय माने. ही सगळी पात्रे अफलातून आहेत आणि आजही जशीच्या तशी लक्षात आहेत. यात अगदी नगण्य भूमिकेतील सुहास भालेकर, बिपीन वर्टी, मधू आपटे हे कलाकार देखील लक्षात आहेत. हा चित्रपट सर्वार्थाने मनोरंजन आहे.
या चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का..? ठक ठक. डायबेटीसच्या औषधासाठीचे ७० रुपये.. औषध आणतो तो वाट बघा.. सारख सारख त्याच झाडावर काय.. बिचारीला नवऱ्याने टाकलीय.. जाऊबाई, नका बाई इतक्यात जाऊ.. अल्सरचा त्रास आहे हो मला…..लिंबाचं लोणचं म्हणजे माझा जीव की प्राण.. असे कित्येक संवाद या चित्रपटाला आजतागायत जिवंत ठेवून आहेत. या चित्रपटात पुरुषांनी स्त्री पात्र साकारून महिलांना देखील एक विशेष मान दिला आहे हे या चित्रपटाचे आणखी एक कौतुक.. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेला पश्या आणि पश्याने साकारलेली पार्वती तसेच अभिनेता सचिन पिळगावकर यांनी साकारलेला सुधीर आणि सुधीरने साकारलेली सुधा प्रेक्षकांना आजही भावते.
झी टॉकीजच्या पोस्टवर या चित्रपटाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील एकाने लिहिले आहे कि, ‘७० रुपये वारून आज ३४ वर्ष झाले’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘३४ वर्ष झाली नवऱ्यानी टाकून हिला’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा न येणारा चित्रपट’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘३४ वर्ष झाली पण आजही हा चित्रपट किती वेळा पाहू आणि कितीवेळा नाही असं होत मला.. मला खूप आवडतो हा चित्रपट.’ याशिवाय अन्य अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर त्यांना या चित्रपटातील आवडलेल्या विविध संवादांचा उल्लेख केला आहे. अशा या बहारदार कलाकृतीला Hello Bollywood चा सलाम!
Discussion about this post