हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो बिग बॉसच्या घरात अनेक कलाकारांच्या जोड्या जमल्या. काही टिकल्या तर काही तुटल्या. अशाच जोड्यांपैकी एक जोडी सांगायची म्हटली तर एजाज खान आणि पवित्रा पुनिया. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडूनही आपलं सूत टिकवणाऱ्या ईशान आणि मायशा, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश, प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी, रोशेल राव आणि किथ सिक्वेरा यांच्या यादीत आता एजाज खान आणि पवित्रा पुनिया हि जोडी देखील सामील झाली आहे.
बिग बॉसच्या घरात असताना एजाज खान आणि पवित्रा पुनिया अनेकदा भांडले पण एकत्र राहिले. एकमेकांवर जीव जडल्याचे त्यांनी याच शोमध्ये मान्य केले. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या रिलेशनमुळे ते वारंवार चर्चेत राहिले. बिग बॉसच्या १४ व्या सीझनने त्यांना कायमच एकत्र आणलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथेच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरवात झाली आणि अखेर आता त्यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे. बिग बॉसच्या घरातील काही भांडणांमुळे दोघांमधील अंतर वाढले आणि ते दोघेही वेगळे झाले अशी चर्चा होती. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर ते काही काळ लिव्ह-इनमध्ये राहिले होते. यानंतर आता त्यांच्या रिंग सेरेमनीची जोरात चर्चा सुरु झाली आहे.
एकीकडे चाहते ते कधी लग्न करणार याबाबत उत्सुक आहेत. तर दुसरीकडे पवित्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या हातातली हिऱ्याची अंगठी दाखवत फोटो शेअर केला आहे. इतकंच काय तर सोबत तिने “Whattt!!!!!???” असे कॅप्शन दिले आहे. यामुळे नक्की काय झालं ते राहील बाजूला पण चमकणारा हिरा सांगतोय कि आता लवकरच एजाज आणि पवित्रा लग्न करणार आहेत. या स्टोरीमध्ये तिने भले काही खुलासा केला नसेल पण तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हातातील अंगठी बरंच काही बोलतेय.
Discussion about this post