हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा सीजन १६ खुप कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतो आहे. पण शोमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने तर प्रेक्षकांच्या काळजाला हात घातलाय म्हणावं लागेल. बघता बघता काही क्षणातच तो सगळ्यांच्या मनावर राज्य करताना दिसतोय. हा स्पर्धक दुसरा तिसरा कुणी नसून अब्दू रोझीक आहे. उंचीने लहान असला तरी बोलण्या आणि वागण्यामध्ये सगळ्यांपेक्षा तो अव्वल आहे. अब्दू वयानेदेखील फक्त १९ वर्षांचा आहे, पण कमी वयात त्याच्याकडे असेलला अनुभव आणि त्यातून आलेलं शहाणपण अगदी हैराण करणार आहे.
गेल्या एपिसोडमध्ये अब्दूने रॅपर एमसी स्टॅनला आपल्या अनुभवातून आलेल्या ज्ञानाने प्रोत्साहित केलं. एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक दरम्यान खूप मजेदार क्षण पाहायला मिळत असतात. दरम्यान बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन काहीसा अस्वस्थ वाटला. यामुळे तो अॅक्टिव्हिटीमध्ये खूप कमी सहभाग घेताना दिसतोय. या आठवड्यात एमसी स्टॅनला एलिमिनेट देखील करण्यात आलं. स्वतःला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी त्याला बिग बॉसकडून एक संधी मिळाली पण त्याचा फायदा त्याला घेता आलेला नाही. यामुळे आपण शो मधून बाहेर पडू असं त्याला वाटतंय. अशावेळी अब्दू त्याला प्रेरित करण्यासाठी त्याच्या जवळ जातो.
एमसी स्टॅनला प्रोत्साहन देत असताना अब्दू स्वतःच भावुक होतो. यावेळी तो बोलताना दिसतो कि, ‘सोशल मीडियावर मला आधी खूप ट्रोल केलं जायचं. खूप हीन दर्जाच्या कमेंट्स मला आजही मिळतात. पण असं असून देखील मी खूप सकारात्मक मनःस्थितीत राहण्याचा सतत प्रयत्न करतो. कारण मी माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कधीच नकारात्मक ठेवला नाही आणि ठेवणारही नाही. लोकांपैकी कुणी मला कचरा म्हणायचं, तर कधी खूप घाणेरड्या शिव्या देत चुकीच्या भाषेत लोक माझ्यासाठी कमेंट करायचे. पण याच सगळ्या गोष्टी मला आणखी स्ट्रॉंग बनवत होत्या.’
पुढे म्हणतो कि, ‘आयुष्यात नेहमीच आपल्याला सुख कसं मिळेल. काही दुःखाचे क्षणही येतीलच ना. मला बिग बॉसच्या घरात राहणं आवडतंय कारण मी इथे आल्यापासून वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना भेटलो. त्यांना अगदी जवळून अनुभवणं मला आवडतंय. त्यांच्याकडून खूप गोष्टींविषयी कळतं आणि ते माझ्या ज्ञानात भर घालत आहे. बाहेर सगळे मला अब्दू रोझिक नावाने ओळखतात. पण माझ्याकडे सेलिब्रिटी म्हणून आज पाहिलं जातं आहे. इथे बिग बॉसच्या घरात आपण सगळे सारखे आहोत. सगळे काम करतोय, अगदी पडेल ते. तसंच आहे. तुम्ही कायम सुपरस्टार राहू शकत नाही आणि कायम तुमच्याकडे पैसा येईल असंही होऊ शकत नाही. शिवाय कायम तुमच्या आजुबाजूला तुम्हाला हवी असतील अशीच लोक वावरतील असंही नसतं’.
Discussion about this post