हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुमचं लग्न झालंय का..? उत्तर हो असेल तर तुमचे जुळले होते का ओ ३६ गूण..? मुळात लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात गोड, थ्रिलिंग, आयुष्य बदलून टाकणारी अशी महत्वपूर्ण बाब आहे. जी कुंडलीच्या जोरावर ठरवली जाते. इथे दोन कुटुंब आणि दोन मनं कुंडलीतील ३६ गुण जुळतात. पण याबाबतीत संतोष जुवेकरची चॉईस थोडी वेगळी आहे. तो म्हणतोय कि, ‘कुंडली नाही, मतं जुळायला हवी’ आणि हाच संदेश घेऊन त्याचा आगामी चित्रपट ३६ गुण लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. पण त्याआधी या चित्रपटाचा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे.
दिग्दर्शक समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ या मराठी चित्रपटाचा टिझर अलीकडेच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘३६ गुण’ हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हि गोष्ट आपल्या मनाचा आणि मताचा विचार न करता अपेक्षांचा मापदंड लावून लग्न करणाऱ्या सुधीर आणि क्रियाची आहे. लग्न केल्यानंतर मधुचंद्रापासून त्यांना एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. मग त्यांच्यात भांडणं होऊन खटके उडू लागतात. इथे नेमकं काय चूक आणि काय बरोबर? हेच त्यांना कळत नसतं. मग अशावेळी हे नातं टिकणार का तुटणार..? असा प्रश्न पडतो. याच थोड्या सकारात्मक थोडं विचार करायला भाग पाडणाऱ्या गोष्टीची झलक टीझरमध्ये दाखवली आहे.
या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार सुद्धा अन्य भूमिकेत दिसणार आहेत. नाती आशा- अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत तर प्रेमाच्या सुंदर धाग्यात बांधली जावी अशी याची संकल्पना आहे. ‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत.
Discussion about this post