हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुलतानी अंधार पसरलेला असताना माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आपल्या भेटीस येण्यास सज्ज आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबाबत वेगळीच उत्सुकता आहे. या चित्रपटाला अत्यंत तगडी स्टारकास्ट लाभली आहे. झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटातील बांदल मावळ्यांची शस्त्र तयार करणाऱ्या कुशल लोहाराच्या भूमिकेवरून पडदा उठला आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटातील अत्यंत महत्वपूर्ण भूमिका म्हणून या भूमिकेकडे पाहिले जात आहे. म्हणूनच या भूमिकेवरून पडदा उघडताना झी स्टुडिओजने लिहिले आहे कि, ‘स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांसाठी आणि बांदल सेनेसाठी शस्त्र बनवणारे लोहारशाळेमधले अत्यंत बुद्धिमान आणि कुशल कारागीर, म्हणजे तावजी. त्यांच्या भूमिकेत अभिनेते किशोर कदम. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार…येत्या दिवाळीत, २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.’
भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे तर त्यांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत सायली संजीव दिसणार आहे. याशिवाय बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे.
Discussion about this post