हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील हिंदी, मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिकराज्य गाजवणाऱ्या अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मनोरंजन सृष्टीतील त्यांचे योगदान पाहून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘गंधार’ संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार २०२२’ हा मनाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात हा पुरस्कार पिळगांवकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
सिने विश्वात सचिन पिळगांवकर हे नाव प्रचंड मोठे आहे. अनेक चित्रपट, शेकडो भूमिका त्यांनी गाजवल्या आणि प्रेक्षकांना नेहमीच भरभरून मनोरंजन केले आहे. केवळ मराठीत नव्हे तर हिंदीतही त्यांनी त्यांचे पाय घट्ट रोवले. यामुळे आजतागायत सचिन पिळगावकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानिक करण्यात आले आहे. यानंतर आता त्यांच्या पुरस्कारांच्या यादीत गंधार पुरस्काराची देखील भर पडणार आहे.
‘गंधार’ ही एक नाट्य संस्था आहे. जी दरवर्षी ‘गंधार गौरव पुरस्कार’ देऊन हरहुन्नरी कलाकारांचा गौरव करीत असते. यंदाचा मान हा सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील गडकरी रंगायतन ठाणे येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात देण्यात येणार आहे.
गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. आतापर्यंत या पुरस्कार सोहळ्याचे ६ वर्ष पूर्ण झाले आहेत. यंदाचा पुरस्कार सोहळा हा ७ वा आहे. सचिन पिळगांवकर यांच्याआधी ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा गंधार पुरस्कार सोहळा हा मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ऍड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मुख्य म्हणजे यांच्याच हस्ते हा पुरस्कार सचिन पिळगांवकर यांना प्रदान करण्यात येईल.
Discussion about this post