हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची धाकड गर्ल म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत सध्या बायोपिक चित्रपटांच्या प्रेमात बिमात पडली आहे का काय..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय. कारण अलीकडेच जयललिता यांच्या बायोपिकनंतर तिने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली. यानंतर आता ती वेश्या समाजातून उदयास आलेल्या नाट्य अभिनेत्री ‘बिनोदिनी दासी’ यांच्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. कंगनाची चाहत्यांसाठी हि अतिशय मोठी बाब आहे.
या बायोपिकमध्ये कंगना एक अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे. हा बायोपिक प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार दिग्दर्शित करणार आहेत. याआधी प्रदिप यांनी ‘परिणीता’सारखा दर्जेदार चित्रपट सिनेइंडस्ट्रीला दिला आहे. कंगना रनौतनं नुकतीच एक घोषणा करत या चित्रपटाची माहिती दिली आहे. या सिनेमाविषयी बोलताना अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली कि, ‘प्रदीप सरकार यांची मी प्रचंड मोठी चाहती आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत हा चित्रपट करणं हे मी माझं फार मोठं भाग्य समजते. या चित्रपटाचे लेखक प्रकाश कापडियां यांच्यासोबत मी पहिल्यांदाच एखादी कलाकृती करत असल्याने मी याबाबत फारच उत्सुक आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मला अनेक दर्जेदार कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करून काम करण्याची संधी मिळणार आहे हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या प्रोजेक्टबाबत मी खरंच खूप उत्सुक आहे.’
बायोपिक होणार हे ठीक आहे. पण कंगना साकारत असलेली हि भूमिका नक्की कोणाची आहे..? या ‘बिनोदिनी दासी’ नक्की आहेत तरी कोण..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ‘बिनोदिनी दासी’ या बंगालमधील प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री आहेत. अभिनेत्री बिनोदिनी यांचा जन्म कोलकाता येथील वेश्या समाजात झाला होता. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच अभिनयाला सुरुवात केली आणि वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी अभिनय करणं सोडलं. त्या खूपच गरीब कुटुंबातून होत्या. त्यांच्याविषयी बोललं जातं की, त्या स्वतः वेश्या व्यवसायाचा भाग होत्या. शिवाय त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रातही स्वतःला वेश्या म्हणून संबोधलं होतं.
लग्नाबद्दल बोलायचं तर त्यांच्या वयाच्या ५ व्या वर्षीच त्यांची लग्नगाठ बांधली गेली. पण काही वर्षांनी त्यांच्या पतीसोबत त्यांनी संबंध तोडले. बिनोदिनी यांनी ग्रेट नॅशनल थिएटरमधून द्रौपदीची भूमिका साकारत इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यांनी बंगाली थिएटरमध्ये खूप काम केलं. प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य लेखक गिरी चंद्र घोष यांच्याकडून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आणि १८८३ मध्ये त्यांच्यासोबत स्टार थिएटरची सुरुवात केली. बिनोदिनी यांच्यावर समाजाने अनेकदा शिंथोडे उडवले. तरीही त्या उभ्या राहिल्या आपल्या मुलीसाठी. पण नशिबाने पाठ फिरवली आणि वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांच्या लेकीला देवाज्ञा झाली. तर बिनोदिनी यांनी प्रचंड अवहेलनेसह ४१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अशा होत्या ‘बिनोदिनी दासी’. हे वाचल्यानंतर कंगनाला या भूमिकेत पाहण्यासाठी नक्कीच तुम्हीही उत्सुक असाल यात तीळभरही शंका नाही.
Discussion about this post