हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओज निर्मित ‘हर हर महादेव’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल ५ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे तेलगू पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्या हस्ते या पोस्टरचे प्रकाशन झाले. यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि टीम त्यांच्या भेटीसाठी हैद्राबाद येथे गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सुबोध भावे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
या फोटोंसह कॅप्शनमध्ये सुबोध भावे यांनी लिहिले आहे कि, ‘आज ‘हर हर महादेव’ चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याच्या निमित्ताने हैद्राबाद येथे तेलगू सुपरस्टार नागार्जुन सर यांची भेट घेतली. त्यांच्या हस्ते चित्रपटाचं तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आलं. समस्त तेलगू बंधू भगिनींना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी आणि शिव विचार जाणून घेण्याचे आवाहन केले. ते स्वतः छत्रपतींच्या चरीत्राने प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘हर हर महादेव’ च्या संपूर्ण संघाच्या वतीने आम्ही त्यांना सिंहासनारूढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली. मराठी चित्रपट सर्वदूर नेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच ‘हर हर महादेव’ चित्रपट तेलगू भाषेत पाहणार असल्याचं सांगितलं. नागार्जुन सर आपले आमच्या तमाम शिव – भक्तांतर्फे मनापासून आभार मानतो.. हर हर महादेव.
अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी अत्यंत तगडी अशी स्टारकास्ट लाभली आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे तर त्यांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत सायली संजीव दिसणार आहे. याशिवाय बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. तसेच सिद्धी जौहरच्या भूमिकेत मिलिंद शिंदे दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहे.
Discussion about this post