हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माणसाने रोज खूप हसल्याने आयुष्य वाढत असं म्हणतात. म्हणूनच सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील हास्यवीरांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा पण केला आहे. हे कलाकार नेहमीच वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्किट्समधून प्रेक्षकांना अगदी लोटपोट होईपर्यंत खळखळून हसवतात. त्यामुळे हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या आवडत्या कार्यक्रमांपैकी एक झाला आहे. हास्यजत्रेचा भला मोठा प्रेक्षक वर्ग असल्यामुळे या दिवाळीत हास्यजत्रा एक मोठं सरप्राईज घेऊन आली आहे. हे सरप्राईज काय आहे ते जाणून घ्या खालीलप्रमाणे.
तुमच्या टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने रसिकांच्या मानत एक हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त रसिकांसाठी काहीतरी खास करणं तर बनता है! म्हणूनच दिवाळी निमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या रंगमंचावर पाहुणे म्हणून प्रशांत दामले आले आहेत. अभिनेता प्रशांत दामले यांनी आजपर्यंत विविध ढंगाची नाटकं, मालिका आणि चित्रपट केले आहेत. पण चित्रपटांपेक्षा त्यांचा कल नेहमी नाटकाकडे जास्त राहिला आहे. रंगभूमीशी एक वेगळंच नातं त्यांचं जोडलं गेलंय. प्रशांत दामले यांच्या नाटकांचे १२,५०० प्रयोग पूर्ण होत आहेत आणि म्हणून या निमित्ताने ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात आले आहेत.
प्रशांत दामले यांना हास्यजत्रेच्या हास्यवीरांसोबत स्कीट करण्याची इच्छा होती आणि त्यांनी इथे ती पूर्ण केली आहे. हास्य जत्रेचे शूटिंग हा तसा किचकट भाग. पण शूटिंगच्या आदल्या दिवशी रंगीत तालीम करून प्रशांत दामले यांनी आपल्यासोबत हास्यवीरांना जोडून घेतलं. त्यांनी अगदी नाटकासारखं स्क्रिप्ट बरोबर आपल्या परीने इम्प्रोवाइज केलं आणि सादरही केलं. या स्कीटमध्ये त्यांच्याबरोबर प्राजक्ता माळी, समीर चौगुले, शिवाली परब, ओंकार राऊत आणि चेतना भट यांचा सहभाग आहे. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार आणि विशेष स्कीट पहायला व्हा तयार! दिवाळी विशेष भाग सोमवार २४ ऑक्टोबर २०२ रोजी सोनी मराठीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोमवार, रात्री ९ वा. हा भाग प्रसारित होईल.
Discussion about this post