हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिनेता संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. अत्यंत वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता पुष्कर श्रोत्री एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यातला विरलेला संवाद पुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी पुष्कर यांच्या खांद्यावर आहे. या चित्रपटात ते समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अतिशय वेगळा अंदाज आणि उत्कट भावना घेऊन या भूमिकेत पुष्कर आपल्या भेटीस सज्ज झाले आहेत.
आपल्या या नव्या आणि विशेष भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर श्रोत्री यांनी सांगितले की, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच. पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, आपोआपच कोणत्याही नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा एक अत्यंत खास चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा.’ या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार हे कलाकार मध्यवर्ती भूमिकेतआहेत . तर पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत.
‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ या आगामी चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर चतुरपटाची प्रस्तुती निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांनी लिहिली आहे. तसेच यातील लक्षवेधी संवाद हृषिकेश कोळी यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसाद भेंडे आणि संकलन आशिष म्हात्रेसह अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. तर चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे लिखित आणि अजित परब यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.
Discussion about this post