हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत जे बोलल्या जाणाऱ्या विषयांवर एखादी विशिष्ट कलाकृती तयार करून त्या त्या विषयाला तोंड फोडताना दिसत आहेत. ज्या विषयांना एका मंचाची आवश्यकता आहे ते विषय आज समाजासमोर चित्रपटांच्या माध्यमातून येत आहेत याहून अधिक गर्वाची बाब ती काय.. असाच एक अतिशय वेगळ्या कथानकाचा अतिशय वेगळा आशयाचा आणि अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे ‘पल्याड’. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळवून या चित्रपटाने आपली प्रतिभा आधीच दर्शवली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल इतकीच प्रतीक्षा होती. यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
‘पल्याड’ या चित्रपटाने ‘गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये बाजी मारलीच शिवाय आजवर १४ महोत्सवांमध्ये या चित्रपटाने महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. ज्याची सर्वत्र प्रचंड चर्चा रंगली. ‘मुक्ती देईन म्हणजे काय रं आबा?’ या लहान मुलाच्या संवादाने या ट्रेलरची सुरुवात होते आणि पाप- पुण्याच्या फेऱ्यातून मुक्त करणं म्हणजे काय..? प्रेताचे अंतिम कार्य पार पाडणाऱ्या समाजाला काय व्यथा होतात..? त्यांचं जगणं मरणाहून कठीण आहे या विषयावर हा चित्रपट बोलतो. त्यामुळे या चित्रपटाबाबत एक वेगळी आत्मीयता निर्माण होते. हा चित्रपट प्रत्येक माणसाने पाहावा अशी कलाकृती आहे. म्हणूनच येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
‘पल्याड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश दुपारे यांचे आहे. तर निर्मिती चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माता पवन सादमवार, सूरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात शशांक शेंडे यांनी महादू हे पात्र साकारले आहे. त्यांचा नातू आठ वर्षांचा शंभू आणि शंभूची आई लक्ष्मी अशा स्मशानजोगी समाजातील कुटुंबाची हि कथा आहे.
शंभू शाळेपर्यंत जातो, पण खिडकीतून शाळा शिकतो. त्याला शिक्षणाची आवड आहे म्हणून आईलाही त्याला शिकवायचंय. त्याने प्रथा-परंपरेतून बाहेर पडून मोठं नाव कमवाव असं तिलाही वाटत. पण आजोबांना वाटतं की, माझ्या पश्चात नातवानं आपला वारसा पुढे चालवावा. त्यामुळे शिक्षण कशाला? शंभूच्या शिक्षणाला समाजाचाही विरोध आहेच. त्यामुळे आजोबा, नातू आणि सूनबाई यांचा आपल्या आपल्या जीवनाशी वेगळा संघर्ष यात दिसून येतो.
Discussion about this post