हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मस्त, बिंधास्त आणि निर्धास्त जगायचं असेल तर आयुष्यात किमान एक छंद तरी असायलाच हवा. हा छंद नुसता असून चालत नाही तर तो जपताही यायला हवा. असाच एक छंद महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आहे. मनोरंजन क्षेत्रात आपणही चुटुक पुटूक कार्यरत राहावे अशी त्यांची मनशा असल्याचे त्यांनी याआधीही सांगितले आहे. शिवाय व्यंग चित्र काढणे, फोटोग्राफी आणि मुख्य म्हणजे नाटक तसेच सिनेमा पाहणे यात राज ठाकरे यांना विशेष रस आहे. म्हणून त्यांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. यानंतर त्यांनी नाटकाविषयी भरभरून प्रतिक्रिया देखील दिल्या.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता अशोक सराफ आणि कॉमेडी विश्वातील दिग्गज अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक म्हणजे मनोरंजनाची एक विशेष पर्वणीचं म्हणावे लागेल. त्यामुळे हे नाटक पाहिल्यानंतर कुणी प्रेमात पडणार नाही असे होणे शक्य नाही. असेच काहीसे राज ठाकरे यांच्या बाबतीतही झाले.
या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मिडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत या नाटकाविषयी आपली खास प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी अशोक सराफ आणि त्यांच्या टिमसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच. पण वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक- दिग्दर्शक- कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील’.
Discussion about this post