हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुम्हाला काय वाटत..? लग्न जुळण्यासाठी पत्रिकेतले ३६ गुण जुळणे गरजेचे आहे..? का त्या दोन माणसांची मन जुळणे महत्वाचे आहे..? मुळात लग्न संस्थेबाबत आजही अनेकांच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि म्हणून असे प्रश्न वारंवार निर्माण होत असतात. कारण लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात गोड, थ्रिलिंग, आयुष्य बदलून टाकणारी अशी महत्वपूर्ण बाब आहे. जी कुंडलीच्या जोरावर ठरवली जाते. इथे दोन कुटुंब आणि दोन मनं यांच्यापेक्षा महत्वाचे असतात हे कुंडलीतील ३६ गुण. पण याबाबतीत संतोष जुवेकर आणि पूर्वा पवारची चॉईस थोडी वेगळी आहे. ते म्हणतायत कि, ‘कुंडली नाही, मतं जुळायला हवी’ आणि हाच संदेश घेऊन उद्या त्यांचा ‘३६ गुण’ हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.
आजपर्यंत अनेकांनी अनेकांच्या पत्रिका जुळवून गुणांची तडजोड करीत लग्न केलं असेल. अनेकांची टिकली असतील तर अनेकांची तुटलीही असतील. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असे म्हणूनही हे विषय समाजात चवीने चघळले जातात. घरदारं, कुटुंब, शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचे लग्नपत्रिकेतले ‘३६ गुण’ हि परंपरा कुणी सुरु केली माहित नाही. पण या ३६ गुणांच्या नादात अनेकांची आयुष्य अस्थाव्यस्थ झाली आहेत हे नक्की. म्हणून या प्रश्नांची उत्तरं देणारा समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ हा आजच्या पिढीला आपला वाटेल असा चित्रपट उद्या शुक्रवारी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांची मध्यवर्ती भूमिका आहे. तर पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारदेखील सहाय्यक मात्र महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. घरातल्यांच्या संमतीने, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने, रीतसर पत्रिका बघून लग्न केलेल्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या चुका दिसतात आणि मग या नात्यात येत वादळ. नेमकं चूकतंय काय.. ? हे शोधण्याच्या नादात सगळंच विस्कटतं. लग्न झालेल्या आणि न झालेल्या सगळयांना समोरं ठेवून हा चित्रपट तयार केला आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. तर संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. हा चित्रपट आजच्या पिढीच्या विचारांशी एकसंगत ठेवतो आणि त्यामुळे या चित्रपटाला तरुणांचा भव्य प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आता उद्यानंतरच कळेल कि, संतोष आणि पूर्वा यांचे ‘३६ गुण’ प्रेक्षकांशी जुळणार कि नाही..
Discussion about this post