हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बुधवारी आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाच्या शुभारंभाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज यांच्या हस्ते चित्रपटाचा फर्स्ट क्लॅप दिला गेला. दरम्यान चित्रपटातील शिव छत्रपती यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार असून त्याच फर्स्ट लूक समोर आला आहे. जो पाहून सगळेच हक्काबक्का झाले. हि भूमिका आपल्याला राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली असे अक्षयने सांगितले आहे.
नुकत्याच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तो म्हणाला कि, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी खरंच खूप मोठं आव्हान आहे. पण मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही राज ठाकरेंमुळे मिळाली. त्यांनी मला आश्वासन दिलं की, मी ही भूमिका साकारू शकेन. माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत मोठी बाब आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मी माझं सर्वस्व अर्पण करेन. खरंच मी युवा भूमिकेसाठी कठोर मेहनत घेईन.’
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार याची निवड करण्यावर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. शुभारंभ कार्यक्रमात मांजरेकर म्हणाले कि, ‘अक्षय कुमारसोबत काम करण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. या भूमिकेसाठी मी त्याच्याशिवाय दुसरा कोणत्याच अभिनेत्याचा विचार करू शकतच नाही. आम्हाला ठराविक व्यक्तिमत्त्व आणि योग्य लूक हवा होता. अशावेळी मला वाटलं कि, हिंदू राजाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय हा परफेक्ट अभिनेता आहे.’
कुरेशी प्रॉडक्शन्स निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त शिवरायांच्या सात मावळ्यांच्या भूमिकेसाठी तगडी स्टारकास्ट निवडण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे.
Discussion about this post