हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुलतानी अंधार पसरलेला असताना माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेत आहे. तर शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत. एकीकडे हा चित्रपट चांगला गाजत असताना संभाजी ब्रिगेडने मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. या चित्रपटात इतिहासाची सोयीने तोडमोड केल्याचा आरोप करीत काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील एका थिएटरमध्ये राडा घालत शो बंद पाडला.
दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट खरा इतिहास दर्शवित नाही. तर या चित्रपटात इतिहासाची सोयीने तोडमोड करण्यात आली आहे. काल संभाजीराजे छत्रपती यांनी आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी हर हर महादेवच्या निर्मात्यांना या गोष्टीवरून फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटावर घेतलेला आक्षेप पाहून आता सर्वत्र वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. या विधानानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नुकताच पुण्यातील पिंपरीमधील विशाल थिएटरमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा चालू शो बंद पाडला आहे.
खात्रीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकरित्या ‘हर हर महादेव’ या मराठी ऐतिहासिक चित्रपटाचा चालू शो बंद पाडला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आणि त्यांनी आक्षेप दर्शविल्यानंतर आता सोशल मीडियावर ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे हे दोन्ही ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Discussion about this post