हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित होऊन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला ‘हर हर महादेव’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या मराठी चित्रपटावरून सध्या राजकीय क्षेत्रात आणि महाराष्ट्रातील विविध भागात मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा असल्याचे म्हणत अनेक संघटनांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात बंड पुकारला आहे. इतकेच नव्हे तर काही संघटनांनी या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर नोटीसदेखील बजावली आहे.
सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात या चित्रपटाविरोधात जोरदार आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये चालू शो बंद पाडला. या चित्रपटात मूळ इतिहासाला तोडून मोडून स्वतःच्या सोयीने काल्पनिक दृश्ये दाखवली गेली आहेत. या चित्रपटातील दृश्ये मूळ इतिहासाला अनुसरून दाखवली गेली नाहीत, असा आरोप विविध संघटनांनी कायदेशीर नोटिस बजावताना केला असून सिनेमॅटिक लिबर्टीवरूनही बरेच आरोप केले आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला मराठी साम्राज्य म्हटलं गेलं आहे जे ‘मराठा साम्राज्य’ असे आहे. शिवाय बाजीप्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील युद्ध खरंच झालं होत का..? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
चित्रपटाविरोधात ज्या संघटनांनी नोटीस पाठवली आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, मराठा सेवा संघ आणि ऑल इंडिया शिवजयंती महोत्सत्व समिती यांचा समावेश आहे. शिवरायांना सर्व भाषांचं ज्ञान होतं. मात्र त्यांना फक्त मराठी भाषेप्रती प्रेम होतं असं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे तिथे उपस्थित नव्हते. मात्र चित्रपटात त्यांची उपस्थिती दाखवली गेली आहे. अशा विविध मुद्द्यांची मांडणी करीत या संघटनांनी चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
Discussion about this post