हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे हा चित्रपट जगप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. जे केदार शिंदे यांचे आजोबा आहेत. आजोबांचे जीवन आणि लोककलेचा ध्यास प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी केदार शिंदे आणि त्यांची टीम प्रचंड मेहनत घेत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. विविध लोकेशन्सवर चित्रपटाचे शूटिंग होणार असून या संपूर्ण प्रवासातील विविध किस्से, अनुभव आणि गोष्टी केदार शिंदे आपल्यासोबत शेअर करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
हा व्हिडीओ पोस्ट करताना केदार शिंदे यांनी लिहिले आहे कि, ‘शाहीर साबळे ह्यांनी त्यांच्या शाहिरी कलेची सुरुवात जनता कला पथक नावाचं मंडळ स्थापन करून केली.. आज 2022 मध्ये त्या सगळ्या घटना शूट करताना आम्ही पुन्हा तोच काळ जगण्याचा प्रयत्न करतोय.. ऐतिहासिक किंवा पिरियड सिनेमे बनवणे हे खरोखरच कठीण काम आहे.. पण आम्ही आमच्या परीने ॲक्युरेट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.. त्यामुळे बाबांचं (शाहीरांच) जीवन त्रयस्थपणे आणि अधिक सखोलपणे अभ्यासायची संधीच आम्हाला मिळतेय!!’
याशिवाय आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण कसे सुरु आहे हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना केदार शिंदेंनी एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे आणि ती म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणाला तब्बल १ महिन्याचा काळ उलटून गेला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ विजयादशमीला सुरु झालेल्या महाराष्ट्र शाहीर च्या चित्रीकरणाला आज बरोबर एक महिना झाला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीमचे काम आणि जोश दाखवणारा हा व्हिडिओ.’ हे व्हिडीओ आणि चित्रीकरणादरम्यान सुरु असलेली मजा मस्ती पाहून हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. कारण हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रासाठी भव्य आणि दिव्य अशी अभिमानाची कलाकृती ठरणार आहे.
Discussion about this post