हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या देसी गर्ल प्रियांका चोप्राचा भारत दौरा सुरु आहे असे म्हणायला हरकत नाही. युनिसेफ इंडियाची ॲम्बेसिडर प्रियांका सध्या उत्तर प्रदेशमधील खेड्यांमध्ये वेगवेगळ्या संस्थांची भेट घेत आहे. यात काही शिक्षण संस्थांसह मुलांचं शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या बाबतीत झालेल्या कार्याचा ती आढावा घेत आहे. महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी अगदी २४ तास कार्यरत असलेल्या कंट्रोल रूमलादेखील प्रियंकाने भेट दिली आहे. यावेळी तिने अतिशय महत्वाची माहिती शेअर केली आहे.
प्रियांकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने यूपीमधील महिला आणि मुलांना मदत करणाऱ्या 1090 वुमन पॉवर लाईन (WPL)च्या कंट्रोल रूमला भेट दिली आहे. इथे प्रियांकाने एका महिला पोलीस अधिकाऱ्याला विचारले कि, ‘मला उत्तर प्रदेश बद्दल काही सांगा. मी देखील लखनऊमध्ये राहिलीय. इथे एक प्रकारची भीती आहे खास करून संध्याकाळी सात वाजल्यानंतर.’ प्रियांकाचा प्रश्नार्थक भाव पाहता महिला पोलीस अधिकारी नीरा रावत यांनी तिला मध्येच थांबवत म्हटले कि, ‘मी तुम्हाला डेटा दाखवते’. यानंतर त्या प्रियंकाला घेऊन थेट कंट्रोल रूममध्ये गेल्या. इथे त्यांनी प्रियंकाला संपूर्ण शहरात पोलिसांचे काम कशा स्वरूपात चालते याबाबत माहिती दिली. शिवाय नव्या तंत्रज्ञानाबद्दलसांगताना आता नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि जलद मदतकार्य देणे सोपे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या व्हिडिओसोबत प्रियांकाने कॅप्शनमध्ये कंट्रोल रूमला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. शिवाय भारतातील महिला आणि मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल बोलताना ती म्हणाली कि, ‘पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचाराच्या भीतीमुळे बर्याच महिला आणि मुले तक्रार करत नाहीत. मला आशा आहे की अशा हेल्पलाईनमुळे ते करू शकतील. महिलांच्या सुरक्षेसाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे. परंतु असे उपक्रम ही एक चांगली सुरुवात आहे आणि जर ती प्रभावीपणे अंमलात आणली गेली तर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला नक्की आळा घालता येईल.’
Discussion about this post